न्यायिक कारणासाठी फोंडा तालुका उत्तर गोवा जिल्ह्यात !

गोवा खंडपीठाचा आदेश जारी

|
06th December 2021, 11:26 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने न्यायिक कारणासाठी फोंडा तालुका हा उत्तर जिल्ह्यात येत असल्याचा आदेश जारी करून स्पष्ट केले आहे. याबाबतचा आदेश खंडपीठाचे न्या. मनीष पितळे यांनी हल्लीच जारी केला आहे.
या प्रकरणी कवळे-फोंडा येथील काशीनाथ ढवळीकर उर्फ गावडे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, गावडे याच्या विरोधात पंचायत उपसंचालकाने निवाडा जारी करून त्यांनी बांधलेले बांधकाम जमीनदोस्त करण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला गावडे यांनी नागरी अर्ज दाखल करून दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणी न्यायालयाने संबंधित प्रकरण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचा निर्देश जारी करून त्याचा याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर गावडे यांनी खंडपीठात याचिका दाखल संबंधित प्रकरण दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात येत असल्याचा दावा केला. याप्रकरणाची सुनावणी खंडपीठात झाली असता न्या. मनीष पितळे यांनी सर्व बाजू एेकून घेतली. तसेच महसूल कारणासाठी फोंडा तालुका दक्षिण गोव्यात येत आहे. त्यात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मामलेदार व इतर प्रशासकीय विभागाचा समावेश आहेत. तर न्यायिक कारणासाठी फोंडा तालुका उत्तर गोवा जिल्हा येत असल्याचे स्पष्ट करून सबंधित अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्याची सूचना केली आहे.