वेगळी आघाडी करणे म्हणजे भाजपला मदत

शिवसेनेचे संजय राऊत यांचा ममतांवर निशाणा

|
05th December 2021, 12:09 Hrs
वेगळी आघाडी करणे म्हणजे भाजपला मदत

फोटो : संजय राऊत
मुंबई : सध्या वेगळी आघाडी तयार करणे म्हणजे भाजपला मदत करणे होईल. असे केल्यास ‘तुला न मला, घाल कुत्र्याला’ या म्हणीप्रमाणे स्थिती होईल, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले, यूपीए कुठे आहे, हा ममतांचा प्रश्न योग्यच आहे. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, एनडीए तरी कुठे आहे ? कधीकाळी देशात एनडीए-यूपीएचे राजकारण चालत होते. आज शिवसेना, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. रामविलास पासवान यांचाही पक्ष बाहेर पडला. अशावेळी २०२४ साठी यूपीए अधिक मजबूतपणे उभी राहिली पाहिजे. यूपीएत येण्यासाठी ममता, अखिलेश यादव यांचे मन वळवायला पाहिजे.
संजय राऊत पुढे म्हणाले, शरद पवार यांनी संयमी भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, आधी पर्याय उभा करा, नेतृत्वाचे नंतर बघू. आधी एकत्र या, असे त्याचे म्हणणे आहे. सध्या यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी आहेत. सध्या त्या आजारपणामुळे फार सक्रिय दिसत नाहीत. ममता बॅनर्जींनी विचारलेला प्रश्न चुकीचा नाही, पण देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी करायची असेल तर काँग्रेस वगळून ती होऊ शकत नाही. फॅसिस्ट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.