कोकण रेल्वेची फसवणूक; चौघांविरुद्ध सीबीआय आरोपपत्र


02nd December 2021, 11:50 pm
कोकण रेल्वेची फसवणूक; चौघांविरुद्ध सीबीआय आरोपपत्र

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी :  वेर्णा आणि मडगाव येथील कोकण रेल्वेच्या गार्ड आणि लोको पायलटसाठी असलेल्या विश्रामगृहाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तसेच इतर निधी मिळून १८ लाख ६ हजार ६५ रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय यांत्रिकी अभियंता मंजुनाथ क्षेत्रपाल यांच्यासह कंत्राटदार एम. के. बेलावाडी, गोरधन लाल बलाल आणि उदय बेलावाडी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.             

या प्रकरणी तक्रार आल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केली. त्यानुसार, हुबळी येथील एम. के. बेलावाडी या कंत्राटदाराला वेर्णा आणि मडगाव येथील कोकण रेल्वेच्या गार्ड आणि लोको पायलटसाठी असलेल्या विश्रामगृहाची देखभाल करण्यासाठी १८ मे २०१८ रोजी ९४ लाख ३५ हजार ४७६ रुपयांचा कोकण रेल्वेने १ जून २०१८ ते २५ मे २०१९ या कालावधीसाठी कंत्राट दिले होते. हे कंत्राट कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय यांत्रिकी अभियंता मंजुनाथ क्षेत्रपाल यांनी दिले होते.             

यासाठी रेल्वेने कंत्राटदाराला अकुशल कामगाराचे वेतन प्रत्येकी १४,६१० रुपये, तर कुशल कामगाराचे वेतन प्रत्येकी १९,३५० रुपये दिले होते. परंतु कंत्राटदाराने अकुशल कामगाराना ७,००० रुपये तर कुशल कामगारांना १० हजार रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र कंत्राटदाराने रेल्वेकडून ती रक्कम घेतली. यासाठी त्यांनी त्या कामगाराच्या बँक खात्याचे एटीएम कार्ड वापरून खात्यात जमा होणारे वेतनाचे पैसे काढल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तसेच राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ईएसआय)  पैसे जमा न करता बनावट दस्तावेज तयार करून ती रक्कम रेल्वेकडून घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सीबीआयने कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय यांत्रिकी अभियंता क्षेत्रपाल याच्यासह कंत्राटदार बेलावाडी, गोरधन लाल बलाल आणि उदय बेलावाडी या संशयितांनी  षडयंत्र रचून कोकण रेल्वेची १८,०६,०६५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी सीबीआय गोवा विभागाचे अधीक्षक अाशिष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन निरीक्षक अनिल कुमार दबास यांनी गुन्हा दाखल केला, तर तत्कालीन निरीक्षक एस. एस. परब यांनी पुढील तपास केला होता. निरीक्षक संदीप हळदणकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.             


हेही वाचा