राज्यातील सर्व खाणी सुरू करा

सासष्टी ट्रक मालक संघटनेची मागणी


25th November 2021, 11:04 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
राज्य सरकारकडून आठ खाणपट्टे सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील सात हजार गाड्यांना काम मिळणार नाही. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक निर्णय घेत सर्व खाणी सुरू कराव्यात, अशी मागणी सासष्टी ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष फ्रँकी गोम्स यांनी केली आहे.
सासष्टी ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष फ्रँकी गोम्स यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडले. गोम्स म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील खाणी सुरू करण्याबाबत वक्तव्य करताना आठ खाणी सुरू करण्यात येतील, असे म्हटले आहे. राज्यातील अनेक ट्रक मालकांनी ट्रक विकूनही सध्या राज्यात ७ हजार ट्रक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या केवळ आठ खाणी सुरू झाल्यास जास्तीत जास्त एक हजार ट्रक व्यावसायिकांना काम मिळेल तर इतर सहा हजार ट्रक उभेच राहणार आहेत. ट्रक खाणीवर कामाला लावायचे असल्यास मंत्री व आमदारांकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत. अन्यथा त्या ट्रक मालकांना काम उपलब्ध होणार नाही, याचा अभ्यास करून राज्यातील सर्व ट्रक मालकांना काम उपलब्ध होईल यासाठी राज्यातील सर्व खाणींना मंजुरी द्यावी, अशी मागणी गोम्स यांनी केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील भाजप सरकारकडून वारंवार खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत आश्वासने दिली जात आहेत. आतातरी राज्य सरकारकडून खाण व्यवसाय तत्काळ सुरू होण्याबाबत पावले उचलण्यात यावीत, असेही गोम्स म्हणाले.