आपल्या सामाजिक प्रतिक्रिया हिंसकच का?

बांग्लादेशमधील घटनेचे पडसाद त्रिपुरात, त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात हा घटनाक्रम दुखावणाऱ्या पांथिक, सामाजिक भावनांवर पुन्हा विचार करायला लावतो आणि आपल्याच हिंसक प्रतिक्रियेचे विश्लेषण करायला भाग पाडतो.

Story: विचारचक्र/ प्रसन्न बर्वे |
17th November 2021, 12:10 am
आपल्या सामाजिक प्रतिक्रिया हिंसकच का?

एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया ही कुठे ना कुठे तरी उमटतेच. पण, प्रतिक्रिया कशी उमटते यावर आपली संस्कृती ठरत असते. जे बांग्लादेशात घडले, त्रिपुरात घडले, महाराष्ट्रात घडले आणि मडगाव येथे घडता घडता घडले नाही त्याचा विचार करणे म्हणूनच अगत्याचे ठरते.      

या सर्व घटनाक्रमाची सुरुवात बांग्लादेशमधून झाली. तीही आता नव्हे तर, नवरात्रांत झाली. दि. १३ ऑक्टोबर रोजी कुणीतरी दुर्गा मंडपामधील हनुमंताच्या पायावर कुराणाची प्रत ठेवली. त्यावरून दुर्गा मंडप जाळण्यात आले. नंतर सीसीटीव्ही फूटेजवरून हे लक्षात आले की, असे करणारी व्यक्ती एक मुस्लीमच होती. कोमिलातील सुजानगर येथे राहणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन. त्याची आई अमिना बेगम यांच्या म्हणण्यानुसार तो एक ड्रग अॅडिक्ट होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. पोलिसांच्या माहितीनुसार तो अनेक वर्षांपासून बेकार होता. आता इथे काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. खरोखरच तो अमली पदार्थांचे सेवन करत होता, गतिमंद होता, बेकार होता असे असेल तर निश्चितच त्याचा वापर कुणीतरी करून घेतला आहे. एखादा मुस्लीम हनुमंताच्या पायावर कुराण ठेवून कुराणाचाच अपमान करणार नाही. त्यामुळे, त्याच्या व्यसनांचा किंवा आर्थिक स्थितीचा वापर हे त्याच्याकडून करवून घेण्यात झाला असावा. त्यामुळेच, त्याला पकडून प्रश्न सुटणार नाही. त्याला असे करायला लावणारे कोण होते, हे समोर येणे जास्त आवश्यक आहे.       

ज्यांनी याचे नियोजन केले त्यांचा हेतू त्याचा आधार घेऊन हिंदूंची घरे पेटवणे, दुर्गा मंडप जाळणे, मंदिरे तोडणे हाच होता. त्यासाठी त्यांना एखादे निमित्त हवे होते. त्यासाठी, मुसलमानांनी  कुरणाचाच अपमान करून हे निमित्त तयार केले. त्यांना वाटले होते, ‘हे कुणी हिंदूनेच केले आहे’ या आवईखाली सगळे खपून जाईल. पण, सीसीटीव्ही फूटेजने सर्व उघड केले. हिंदूंना संपवण्यासाठी मुस्लिमांनी त्यांच्यासाठी सर्वोच्च, पवित्र असलेल्या कुराणाचाच अपमान केला. कुठून येते ही आपल्या आस्थेशिवाय इतर आस्था मानणार्यांविषयी नकारात्मक, द्वेषाची भावना? वाट्टेल तसे हिंसेने त्यांना संपवण्याची संकल्पना कुठून येते? याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.       

उत्तर त्रिपुराच्या धर्मनगर या जिल्ह्यातील चमतिला या गावी विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या निषेध यात्रेत मशिदीवर दगडफेक आणि मुस्लिमांच्या दुकानांची तोडफोड झाली. या घटनेनंतर ट्विटरच्या ६८, फेसबुकच्या ३१ आणि यूट्यूबच्या २ पोस्टमधून मशीद जाळल्याचे, मुस्लिमांची दुकाने, घरे जाळल्याचे आणि मुसलमानांचे हत्याकांड केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दंगल पेटली.  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मशिदीवर दगडफेक होणे निषेधार्हच आहे. यात दुमत असण्याचे कारण निश्चितच नाही. पण, जे बांग्लादेशात मुद्दाम घडवण्यात आले आणि त्रिपुरातही मुद्दामच घडवण्यात आले त्याबद्दल काय म्हणायचे? त्याला स्वाभाविक, साहजिक प्रतिक्रिया कसे म्हणता येईल? ‘मुस्लीम समाज आपल्या पंथाविषयी खूपच संवेदनशील आणि हळवा आहे’, हे जाळपोळीचे, मंदिर तोडण्याचे, हत्या करण्याचे आणि दंगल पेटवण्याचे समर्थक कारण कसे होऊ शकते? तसाच विचार केल्यास मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंची हजारो देवळे तोडली आणि त्यावर मशिदी बांधल्या, गोव्यात ख्रिस्ती प्रचारकांनी देवळे तोडली, त्यावर चर्च उभारली. त्याची प्रतिक्रिया याच पद्धतीने उमटली असती तर एक तरी मशीद आणि एक तरी चर्च शिल्लक राहिले असते का, याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रतिक्रिया कशी उमटते व का उमटते या बरोबरच ती कुठे उमटते हेसुद्धा महत्त्वाचे आहे.      

भौगोलिक परिस्थिती पाहिली तर त्रिपुराचा बहुतांश भाग बांग्लादेशच्या सीमांलगत आहे. कोमिला ते धर्मनगर हे अंतरही १०० किलोमीटरच्या आत आहे. त्यामुळे, कोमिलात जे काही घडले त्याचे पडसाद धर्मनगर येथे उमटणे स्वाभाविकच आहे. पण, त्रिपुरात घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांत न उमटता, चक्क महाराष्ट्रात उमटतात. त्याही अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये. जिथे हिंदू मुस्लीम दंगे होण्याचा इतिहास आहे, अशा राज्यांमध्ये न होता महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात. खरे तर घडवल्या जातात.      अपेक्षेप्रमाणे त्रिपुरात आणि महाराष्ट्रात याचे राजकीय भांडवल झाले. शिवसेनेने भाजपला यासाठी जबाबदार धरले आणि भाजपने राष्ट्रवादीला. खरे तर चुकीच्या ठिकाणी होत असलेला मुस्लिमांचा राजकीय-अनुनय याला जबाबदार आहे. महाराष्ट्रात मविआ सत्तेत आल्यानंतर शरद पवार म्हणाले होते की, अल्पसंख्याकांमुळेच आम्ही सत्तेत आलो, काँग्रेसचे अशोक चव्हाण म्हणाले की, आम्ही मुस्लिमांची परवानगी घेऊन मगच शिवसेनेशी युती केली. हे दोघे कुणाबद्दल बोलत आहेत? मुस्लिमांबद्दल की, रझा अकादमीसारख्या संघटनांबद्दल बोलत आहेत? मुस्लीम समाज या राजकारण्यांनाअभिप्रेत नाही. भिवंडी, मुंबई आणि आता अमरावती, नांदेड पेटवणाऱ्या रझा अकादमीशी व त्यांच्या एका हाकेवर एकत्र येणार्या मुस्लिमांच्या संख्येशी या राजकारण्यांचे देणेघेणे आहे.यातील समान सूत्रे आणि त्यामागची मूळ संकल्पना लक्षात घेणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा, असे दंगे आणि घटना वारंवार घडतच राहतील.       

त्रिपुरामध्ये दंगे भडकण्यामागे मशीद जळण्याचे फोटोशॉप केलेले फोटो पसरवण्यात आले. तीच पद्धत महाराष्ट्रातही अवलंबली गेली. त्यानंतर येणार्या राजकीय आणि माध्यमावरील विचारवंतांच्या प्रतिक्रिया ‘बहुसंख्य अल्पसंख्याकांवर बाय डिफॉल्ट अन्याय करतात’ या नॅरेटिव्हबरहुकूम होत्या. त्यानंतर मग आरोप-प्रत्यारोप, इतिहासातील दाखले देणे, चिखलफेक, झुंडशाही हे सर्व षोडशोपचार झाले. यातून दर खेपेला असे का घडते हा मुद्दा, त्यावरील विचारमंथन आणि त्यानुरूप उपाययोजना करणे बाजूलाच पडले किंवा मुद्दाम पाडले गेले.       

मुस्लीम समाजाच्या जगभरातील प्रतिक्रिया हिंसक का असतात, याबद्दल विवेचन करताना वफा सुल्तान ‘अ गॉड हू हेट्स’ या पुस्तकात म्हणतात की, इस्लाम हा फक्त एक पंथ नसून ती एक राजकीय विचारसरणी आहे जी हिंसेचा प्रचार करते आणि आपले म्हणणे सक्तीने लागू करते. इस्लाममुळे जगात निर्माण झालेल्या समस्यांचे मूळ इस्लामच्या शिकवणीतच आहे, असेही त्या म्हणतात. एकेश्वरवाद आपल्याकडेही आहे. पण, त्यासाठी इतर देवांवर विश्वास ठेवणाऱ्यांविषयी घृणा, द्वेष किंवा नकारात्मक विचारसरणी नाही.       

हिंदू संघटना, विचारसरणी इस्लामसारखीच होत आहे का, हा मुद्दाही आता त्यासोबत पडताळणे आवश्यक आहे. सर्वसमावेशकता हा हिंदूंचा गुण हिंदूंसाठीच मारक ठरत आहे, या निष्कर्षाप्रत हिंदू समाज येऊन पोहोचला आहे. या गुणाचे श्रेयही मिळत नाही आणि उलटपक्षी कायम मारच खात राहणे पदरी पडते हा अनुभव आहे. हिंदूंचे जे जे चांगले आहे, ते ते सर्व ‘भारतीय’ या सदराखाली ढकलले जाते आणि जे जे वाईट आहे ते ते सर्व हिंदूंच्या पदरात टाकले जाते. सर्वसमावेश संस्कृतीचा गवगवा केला जातो पण, तिला ‘हिंदू संस्कृती’ न म्हणता ‘भारतीय संस्कृती’ म्हटले जाते.       

मुस्लिमांना हिंसाचारास प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या पांथिक शिकवणीपासून दूर करून इस्लाममधील निर्गुण निराकाराच्या आध्यात्मिक शिकवणीकडे वळवले पाहिजे आणि हिंदूंना अध्यात्माच्या पायावर आधारलेल्या सर्वसमावेशक धर्माकडे वळवले पाहिजे. त्यानंतर कदाचित आपल्या पांथिक, सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. आपल्या प्रतिक्रिया हिंस्र पद्धतीने उमटणार नाहीत.