आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत प्रशासन असंवेदनशील

महाराष्ट्र

Story: राज्यरंग | प्रदीप जोशी |
29th October 2021, 12:27 Hrs
आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत प्रशासन असंवेदनशील

जनतेला आरोग्यासाठीच्या प्राथमिक गरजा पुरवणे, हे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा मोफत आणि सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने दुर्गम भागांतही प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली आहेत. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत असते. शासनाचा हेतू चांगला असला तरी वास्तवात सर्वच गोष्टी त्याप्रमाणे होताना दिसत नाहीत. लोकांच्या सोयीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधण्याचे निश्चित करण्यात आले. दोन वर्षे उलटली तरीही ही इमारत प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. इमारत अपूर्ण असल्यामुळे रुग्णांना दोडामार्ग, ओरोस, सावंतवाडी, कुडाळ, गोवा येथे पाठवावे लागते. त्यासाठी उसनवारीची वेळ रुग्णांवर येते. आरोग्य यंत्रणेची ही अवस्था पाहून संताप व्यक्त होत आहे.      

साटेली, भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र हे दुर्गम भागात सेवा देणारे एकमेव आरोग्य केंद्र आहे. येथे प्रामुख्याने साटेली, भेडशी लगतची गावे, तसेच मांगेली, तेरवण, भेकुर्ली, केर, निडलवाडी, हेवाळे, घाटीवडे, केंद्रे यांसारख्या दुर्गम भागांतील रुग्णांना सेवा दिल्या जातात. ३० ते ३२ गावे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्राथमिक उपचारासाठी अवलंबून आहेत. करोना काळात रुग्णांची आणि नातेवाईकांची फरफट झाली. पंचायत समिती उपसभापती सुनंदा धर्णे यांनी मे महिन्यात आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली होती. पावसाळ्याआधी इमारत पूर्ण करून ताब्यात द्यावी, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. तरीही ऑक्टोबर महिन्यातही इमारतीचे काम अपूर्ण आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती डॉ. आनिशा दळवी यांनी केली आहे.      

 सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आरोग्य केंद्राचे काम तत्काळ पूर्ण करवून घेण्याची मागणी केली होती. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे अखेर प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गवस यांची भेट घेऊन चौकशी केली.  या प्रकरणाकडे पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधू, असे आश्वासन बाबुराव धुरी यांनी दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. १५ दिवसांत या प्रकरणाचा निकाल न लागल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले की, साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी ९३ लाख रुपये मंजूर आहेत. अद्याप काही कामे अपूर्ण आहेत. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ घेतली आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर कामे पूर्ण करून इमारत ताब्यात दिली जाईल.

या इमारतीचा ठेका देतानाच किती दिवसांत इमारत पूर्ण करायची, हे निश्चित केले होते का? दिलेल्या समयमर्यादेत ती का पूर्ण झाली नाही? तालुक्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली इमारत दोन वर्षांनंतरही पूर्ण होऊ नये आणि त्याबद्दल कोणावरच कारवाई होऊ नये, हे अनाकलनीय आहे. ठेकेदाराने मुदतवाढ मागणे आणि त्याला ती दिली जाणे, हेही शंकास्पद आहे. प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या केवळ बाताच मारल्या जातात. प्रत्यक्षात इतक्या महत्त्वाच्या कामाबाबतही जनतेला काहीच सांगितले जात नाही. वारंवार विचारणा केल्यानंतरही दुर्लक्ष केले जाते, यावरूनच प्रशासन जनतेप्रति किती संवेदनशील आहे, ते लक्षात येते. असे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनहिताचा कारभार कधीतरी करू शकतील काय ?