दुबईत डेव्हिड वॉर्नर अखेर गरजला

श्रीलंकेवर ७ गडी राखून मात : ऑस्ट्रेलियाचा टी-२० विश्वचषकात सलग दुसरा विजय

|
28th October 2021, 11:51 Hrs
दुबईत डेव्हिड वॉर्नर अखेर गरजला

दुबई : डेव्हिड वॉर्नरच्या शानदार अर्धशतकाच्या (४२ चेंडूत ६५ धावा) जोरावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२च्या गट एकच्या सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. लंकेने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून गाठले.

गुरुवारी येथे टी-२० विश्वचषक सुपर १२ टप्प्यातील गट ‘एक’च्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५४ धावा केल्या. श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि चारिथ अस्लंका यांनी प्रत्येकी ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झांपा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत केवळ १२ धावा देत दोन बळी घेतले.

परेराने २५ चेंडूत तर अस्लंकाने २७ चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. राजपक्षेनेही २६ चेंडूंच्या नाबाद खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झांपा, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन बळी घेतले.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पॅट कमिन्सने तिसर्याच षटकात पॅथुम निसांका (७) डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद करून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. या षटकात सलग दोन चौकार मारल्यानंतर शानदार लयमध्ये असणाऱ्या चरिथ अस्लंकाने क्रीजवर पाऊल ठेवताच ग्लेन मॅक्सवेलचे पुढच्याच षटकात षटकार ठोकून स्वागत केले.

त्यानंतर त्याने दुसरा चौकार लगावला. श्रीलंकेने मॅक्सवेलच्या षटकात १६ धावा केल्या. त्यात वाईडच्या पाच धावांचा समावेश होता. सलामीवीर कुसल परेराने कमिन्सविरुद्ध चौकार मारून श्रीलंकेला पॉवरप्लेमध्ये १ बाद ५३ अशी मजल मारली. परेराने नवव्या षटकात मार्कस स्टॉइनिसविरुद्ध लागोपाठ दोन चौकार मारून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला पण दहाव्या षटकात अॅडम झांपाने अस्लांकाला आपल्या फिरकीत अडकवले. स्वीप करण्याच्या प्रयत्नात अस्लंकाने स्टीव्ह स्मिथकडे सोपा झेल दिला.

त्याने परेरासोबत दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागिदारी केली. ११व्या षटकात कर्णधार फिंचने मिचेल स्टार्कला चेंडू दिला आणि परेराने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारला पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. झांपाने १२व्या षटकात अविष्का फर्नांडो (चार) आणि कमिन्सने १३व्या षटकात वानिंदू हसरंगा (चार) यांना बाद करून श्रीलंकेला चौथा आणि पाचवा धक्का दिला.

सोळा धावांच्या आत चार विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेची धावगती थांबली पण भानुका राजपक्षेने स्टॉइनिसविरुद्ध सलग दोन चौकार आणि षटकार खेचून १७व्या षटकात १७ धावा केल्या. पुढच्याच षटकात कर्णधार दासुन शनाकाने पॅट कमिन्सविरुद्ध चौकार मारला पण दुसरा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेलबाद झाला. त्याने १९ चेंडूत १२ धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या दोन षटकांत केवळ दोन चौकार मारूनही १९ धावा करून आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.