इंग्लंडकडून बांगलादेशचा धुव्वा

सलामीवीर जेसन रॉयचे अर्धशतक : टायलर मिल्सचे ३ बळी


28th October 2021, 12:08 am
इंग्लंडकडून बांगलादेशचा धुव्वा

अबु धाबी : यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बलाढ्या वेस्ट इंडिजचा ६ विकेटने पराभव केल्यानंतर आता इंग्लंडने बांगलादेशला ८ विकेटने धूळ चारली आहे. बांगलादेशचा हा सलग दुसरा पराभव आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर १२५ धावांचे माफक आव्हान ठेवले. हे आव्हान इंग्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात १४.१ षटकात पूर्ण केले.
इंग्लंडने बांगलादेशचे हे आव्हान पार करताना चांगली सुरुवात केली. सलामीवीर जोस बटलर आणि जेसन रॉय यांनी ५ षटकांत ३९ धावांची सलामी दिली. जोस बटलर १८ धावा करून बाद झाल्यानंतर रॉयने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याने दमदार अर्धशतक पूर्ण करत संघाला शतकी धावसंख्या पार करून दिली. त्याच्या जोडीला आलेल्या डेव्हिड मिलानने त्याला चांगली साथ दिली. मात्र, रॉय ३८ चेंडूमध्ये ६१ धावांची खेळी करून बाद झाला. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. अखेर मिलानने २८ धावांची खेळी करून इंग्लंडचा १४.१ षटकांत विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने खराब फलंदाजी केली. त्यांना २० षटकांत ९ फलंदाजांच्या मोबदल्यात फक्त १२४ धावाच करता आल्या. बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. मोईन अलीने सामन्याच्या तिसऱ्या षटकात लिटन दास (९) आणि नईम (५) या सलामी जोडीला पाठोपाठ बाद केले.
ख्रिस वोक्सने त्यानंतर शाकिब–अल–हसनला ४ धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला. बांगलादेशला या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न मुशफिकूर रहीम आणि कर्णधार मोहम्मदुल्लाने केला. मात्र २९ धावांची खेळी करणाऱ्या रहीमला लिव्हिंगस्टोनने बाद केले. त्यानंतर आलेला अफिफ हुसैन ५ धावा करून धावबाद झाला. यामुळे बांगलादेशची अवस्था ५ बाद ७३ अशी झाली. सावध फलंदाजी करणाऱ्या मोहम्मदुल्ला देखील बांगलादेशला या परिस्थितीतून बाहेर काढू शकला नाही. तो २४ चेंडूत १९ धावा करून माघारी परतला.
कर्णधार माघारी गेल्यानंतर आलेल्या नुरुल हसन (१६), मेहेंदी हसन (११) आणि नसुम अहमद (१९) यांनी छोटेखानी खेळी करत बांगलादेशला शतक पार करून दिले. इंग्लंडकडून टायमल मिल्सने भेदक मारा करत २७ धावांत ३ बळी टिपले. तर मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी २ विकेट घेत बांगलादेशला २० षटकात ९ बाद १२४ धावांवर रोखले.

सलग दोन विजय मिळाल्यामुळे इंग्लंडची टीम पहिल्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये आता पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. यासह त्यांचा नेट रनरेटही तब्बल +३.६१४ एवढा झाला आहे. इंग्लंडचे उरलेले सामने आता श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहेत.
संक्षिप्त धावसंख्या
बांगलादेश : २० षटकांत ९ बाद १२४ धावा
इंग्लंड : १४.१ षटकांत २ बाद १२५ धावा