डबक्यातून बाहेर येऊया का ?

मराठी बिग बॉसमधील प्रवेशावरून महिला कीर्तनकार शिवलीला पाटील लक्ष्य होत आहे. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा शब्दांत शिवलीला ट्रोल होत आहेत. पण या वादात कोणाची बाजू योग्य? की सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे?

Story: मनोरंजन । सचिन खुटवळकर |
16th October 2021, 10:53 Hrs
डबक्यातून बाहेर येऊया का ?

कीर्तनाला हजारो वर्षांची परंपरा आहे. मूलत: ईश्वरभक्तीचा उपदेश आणि निकोप समाज घडविण्याच्या हेतूने कीर्तन परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. हळूहळू कीर्तनाला प्रबोधनाचे स्वरुप आले. त्यातून कीर्तनाचे प्रकार घडत गेले. वारकरी कीर्तन हा त्यातलाच एक प्रकार. महाराष्ट्र आणि गोव्यातही प्रचंड लोकप्रियता आणि जनाधार लाभलेला हा कीर्तन प्रकार आज पुन्हा चर्चेत आला आहे तो मराठी बिग बॉस या मालिकेमुळे. एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या या मालिकेत शिवलीला पाटील ही कीर्तनकार तरुणी सहभागी झाल्यापासून तिच्यावर अतोनात टीका झाली. काही कारणामुळे दोन आठवड्यांतच या शोमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा शिवलीला टीकेची धनी बनली आहे.

मुळात कीर्तन हा पुरुषांचा प्रांत असतानाही यात महिलांनी चांगला लौकिक कमावला आहे. त्यातील काही महिला कीर्तनकार विज्ञानवादी प्रबोधनातून समाज घडवताना दिसतात. परंतु बहुतेकींना धर्म, परंपरा आणि मर्यादांचेच अधिक अप्रुप असलेले दिसून येते. शिवलीला पाटील त्यापैकीच एक. या सर्व मुद्द्यांचा आग्रह धरणे चुकीचे नाही. परंतु बदलत्या काळाप्रमाणे जशा कीर्तनाच्या पद्धतीत बदल झाला, तसा बदल कीर्तनकारांनी स्वीकारायला नको का? पण हीच बाब कुठे तरी अडगळीला पडलेली दिसते. सतत बाईने पदर, हातभरून बांगड्या, साडीचोळीचा वेश, आधुनिक साधनांना दूर सारण्याचा धोशा पाहिला, तर कीर्तनाचा मूळ उद्देश कुठे तरी भरकटल्यासारखा वाटतो. कधी काळी कीर्तनकार मिळेल ती बिदागी स्वीकारत असत. संत तुकाराम महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेचा आधार घेतला, तर कीर्तनकाराने विकाराला थारा न देता तुळशीपत्राशिवाय काहीही स्वीकारू नये. पण कालौघात सामाजिक बदलांच्या प्रवाहात कीर्तन हे चरितार्थाचे साधन बनले. पुढे केवळ ईश्वरभक्तीचा आग्रह न उरता, ‘ऑडियन्स’ हेरून त्याला आवडेल असे कीर्तन सादर होऊ लागले. उत्स्फूर्तपणे सुचणार्याव सुभाषितांची, काव्यपंक्तींची जागा थिल्लर विनोदांनी घेतली. वॉट्सअॅ्प आणि एकूणच सोशल मीडियावरील विनोद कीर्तनात ‘खपवले’ जाऊ लागले. कीर्तनकारांची बिदागी वाढली. गोतावळा वाढला. व्याप वाढला. तारखा आगाऊ आरक्षित होऊ लागल्या. मग बिदागीची चढाओढ सुरू झाली. कीर्तनकारांकडे आलीशान गाड्या आल्या. सर्वसामान्य कीर्तनकार ‘महाराज’ आणि ‘माऊली’ बनले. इथपर्यंत सर्व ठिक आहे. चरितार्थाचे साधन म्हणून कीर्तनाचा आधार घेणे अगदी योग्य. कारण ‘देणारा आहे म्हणून घेणारा आहे,’ हा विचार पोक्तपणे इथे मान्य करायला हवा. पण ज्ञानामृत पाजताना उघडपणे थोतांड म्हणता येईल, अशा गोष्टींचा आग्रह धरण्याची वृत्ती कीर्तनकारांना महागात पडू लागली. एका ठराविक विचारांच्या मानवसमूहाला ते योग्यही वाटू शकेल. पण आजच्या सुशिक्षित आणि प्रगत समाजात अशा गोष्टी सरसकट लागू करणे म्हणजे स्त्रीला पुन्हा बंधनात ढकलण्यासारखे आहे. याच कारणामुळे एका नामवंत कीर्तनकारांविरोधात महाराष्ट्रात तक्रार दाखल झाली. त्यांच्या कीर्तनातील तथाकथित उपदेशांचे व्हिडिओ युट्यूबवरून हटवले गेले. याच कीर्तनकारांच्या परंपरेची पाईक असल्याचे सांगणार्या  शिवलीला पाटील हिला लक्ष्य करण्यात आले ते कीर्तन आणि प्रत्यक्ष जीवनातील विसंगत वागण्यामुळे.

शिवलीला हिची अनेक कीर्तने गाजली. एका कीर्तनात ती स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊनच वावरले पाहिजे असा आग्रह धरते. कधी कुंकू, कधी बांगड्या, कधी इतर कुठल्या परंपरांचा दाखला ती देते. ज्यावेळी ती बिग बॉसमध्ये गेली, तेव्हा तिला पहिल्यांदा लक्ष्य करण्यात आले ते मालिकांच्या विषयावरून. आपल्या कीर्तनात डेलीसोप पाहणार्या  महिलांना नावे ठेवणारी शिवलीला स्वत:च एका मालिकेत सहभागी झाली, हे अनेकांना पटले नाही. त्यानंतर तिच्या पेहरावावरून तिच्यावर टीका झाली. ही टीका होत असतानाच ती आजारी पडली. नंतर तिने बिग बॉसमधून माघारही घेतली. मात्र टीकाकारांचे समाधान झाले नाही. ज्या बंधनांचा आग्रह शिवलीलाने धरला, तीच बंधने झुगारून ती या मालिकेचा भाग बनली, यावरून तिची होईल तितकी टवाळी करण्यात आली. या परिणाम म्हणून प्रकृती बरी झाल्यानंतर पुन्हा कीर्तनासाठी सज्ज होत असतानाच तिची अनेक कीर्तने बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. ज्या वारकरी संप्रदायाचा ती भाग आहे, त्याच वारकरी संप्रदायाची तिच्यावर खप्पामर्जी झाली. त्यातूनच तिने संप्रदायाची जाहीर माफी मागितली. ‘बिग बॉसमध्ये जाणे ही चूक होती. तरीही धर्म, संस्कृती, संप्रदाय, कीर्तन परंपरा, तुळस या गोष्टी मी विसरे नाही. या सगळ्या गोष्टी सर्वदूर पोचण्याच्या हेतूनेच मी बिग बॉसमध्ये गेले. मात्र, तिथेही मी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. तरीही माझी चूक झाली असेल, तर दोन्ही हात जोडून आणि डोके टेकवून माफी मागते,’ असे शिवलीला म्हणाली. पण तरीही तिची बाजू कोणाला पटल्याचे दिसत नाही.

शिवलीला अवघ्या पाच वर्षांची असल्यापासून कीर्तन करते. आतापर्यंत १० हजारांहून अधिक कीर्तने तिने केली आहेत. मात्र याच कीर्तनांमधून तिने केलेले उपदेश तिनेच पायदळी तुडवल्याचे आरोप होत आहेत. या अनुषंगाने दोन्ही बाजू लक्षात घ्यायला हव्या. पहिली बाजू म्हणजे आजच्या प्रगत युगात मुलींना, युवतींना आणि स्त्रियांना धर्म आणि परंपरांच्या बंधनाखाली ठेवणे योग्य नाही. परंपरांचे जतन व्हायलाच हवे. पण ते एकांगी हटवादाच्या जोरावर नव्हे, तर बुद्धीच्या कसोटीवर आणि व्यक्तीसापेक्ष वैचारिकतेच्या आधारावर. काळाची कसोटी त्यासाठी बहुमोलाची. आजच्या जमान्यात डोक्यावर पदर, हात भरून बांगड्या, ठसठशीत कुंकू, जमिनीवर नजर, आधुनिक उपकरणांपासून दूर अशा वातावरणात प्रत्येक हिंदू स्त्री राहू शकेल, अशी कल्पना तरी करणे शक्य आहे का? मग तसा आग्रह प्रबोधनाची पताका खांद्यावर मिरवणार्यांंनी का धरावा? नेहमी परंपरांची ओझी स्त्रियांनीच का वाहावी? तोच न्याय पुरुषांना लावला, तर खरी पंचाईत पुरुषांची होईल. शिवलीला पाटीलच्या म्हणण्याप्रमाणे ‘रोज पाणी घाला, पण मिश्या वाढवा’ असं सगळ्यांना करावे लागेल. जे मुळीच रास्त नाही. त्यामुळे अशा काही तरी जुनाट विचारांना ‘ग्लोरिफाय’ करून, इतर धर्मांतील उदाहरणे देऊन आपल्या धर्मातील स्त्रियांवर अंकुश ठेवण्याचा फाजिल हेतू कोणाचा असेल, तर त्यांनी तो सोडलेलाच बरा. अन्यथा शिवलीलाप्रमाणे अडचणीची स्थिती निर्माण होऊ शकते.

आता दुसरी बाजू. शिवलीलाने कीर्तनात सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या असतीलही. पण एका युवतीला तिच्या खासगी आयुष्यात तिने कसे असावे, कसे वागावे याचे स्वातंत्र्य नाही का? शिवलीलावर टीका करणार्यां नी तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याची खिल्ली उडवून चालणार नाही. तिच्या चुकीच्या विधानांचा प्रतिवाद नक्की करा. ती ज्या मर्यादांचा आग्रह धरत आली आहे, त्या मर्यादांना तिनेच एका अर्थाने नाकारून बिग बॉस शो स्वीकारला, हे बोलके उदाहरण नाही का? तिचे कदाचित मतपरिवर्तनही होऊ शकले असू शकते. पण तिला सातत्याने ट्रोल करून आपणही तिच्या पंक्तीला बसतो आहोत, याचे भान दुसर्या  बाजूच्या लोकांनी ठेवायला हवे. जी वैचारिक साचेबद्धता आपण अनादी कालापासून वागवत आलो आहोत, त्या संकुचित डबक्यातून सगळ्यांनीच बाहेर येण्याची गरज आहे. शिवलीलाच्या निमित्ताने उफाळलेल्या वादामुळे ही गरज पुन्हा ठळक झाली इतकेच.