शहराच्या गजबजाटात माणुसकी हरवत चालली आहे, असे आपल्याला नेहमी वाटते. पण कष्टाची जाणीव ठेवणारा 'मालक' जेव्हा संकटकाळी आपल्या झोपडीपर्यंत पोहोचतो, तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडते. प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता यांची ही एक हृदयस्पर्शी कथा.

"दादा, आपल्या सत्याची आई गेली हो," कृष्णा गल्ल्यावर बसलेल्या मालकाला सांगत होता.
"अं.. कधी..?" किंचित गंभीर होत त्यांनी विचारलं.
"बारा दिवस झाले असतील काल-परवा.." कृष्णा म्हणाला.
"तुला कसं कळलं?" त्यांनी विचारलं.
"त्याचाच फोन आला होता त्या दिवशी. मी त्याच दिवशी बोललो होतो मोठ्या बाईंना, विसरल्या असतील तुम्हाला सांगायचं गडबडीत.." कृष्णा म्हणाला.
"बरं बरं.. जा तू, गिऱ्हाईकं खोळंबलीत," मालक कोरड्या स्वरात म्हणाले आणि कृष्णा कामाला निघून गेला.
सत्यजीत चोर्लेकर, एकोणीस-वीस वर्षांचा, मध्यम उंचीचा, गहुवर्णी आणि अंगकाठीने बेताचाच असलेला, मात्र सतत हसतमुख असलेला मुलगा. चोर्ला घाटापासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर आडगावात तो जन्मला होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने जेमतेम कशीबशी बारावी करून त्याने कामासाठी शहराची वाट धरली होती. बारावीच्या जोरावर कोणी त्याला खुर्चीत बसवणार नाही हे तो जाणून होता, त्यामुळे त्याने छोट्या-मोठ्या कामांकडे मोर्चा वळवला.
त्याची सुरुवात त्याने बस स्टँडवर असलेल्या पुस्तकांच्या दुकानातून केली. मालक तसा बरा होता पण जरा तापट होता. बाजारातून पुस्तके आणण्यापासून ते सकाळी वर्तमानपत्रांचे गठ्ठे रचून विकण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्याने सत्यजीतला शिकवल्या आणि तोही मन लावून शिकला. महिन्याभरात तो तिथे रुळला. महिन्याकाठी हातात पडणारे बाराशे रुपये आणि दुकानात झोपण्याची परवानगी एवढ्यावर तो खुश होता. त्याच्या जेवणाची सोय मालकांनी लावली होती, पण वरण-भात आणि भाजी या पलीकडे त्याला काही मिळत नसे. त्यातही त्याने समाधान मानले आणि काम करत राहिला.
सहा महिने उलटले आणि एक दिवस रखरखीत उन्हात पुस्तके आणायला गेलेल्या सत्यजीतला भर रस्त्यात चक्कर आली आणि तो कोसळला. पुस्तके रस्त्यावर पडून धुळीने माखली. तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्याभोवती लोकांचे कोंडाळे झाले होते. त्याचे डोकं ज्याच्या मांडीवर होते, तो कृष्णा होता. सत्यजीत घाबराघुबरा होऊन उठला, त्याने पुस्तके गोळा केली आणि लगबगीने दुकानाच्या दिशेने गेला. त्या साऱ्या गडबडीत तो कृष्णाचे आभार मानायलाही विसरला. त्याच्या डोळ्यात भीती होती, म्हणून काळजीपोटी कृष्णाने त्याचा पाठलाग केला आणि ज्याची भीती होती तेच झाले. त्याचे काहीही ऐकून न घेता मालकाने त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेतले आणि त्याच्या सामानासकट त्याला तिथून हाकलून दिले.
हतबल झालेला सत्यजीत विखुरलेले चार कपडे, आई-बाबांचा फोटो आणि जमलेल्या पैशांची पुरचुंडी, आपटल्यामुळे खळगा पडून वाकडी झालेल्या ट्रंकेत भरून बस स्टँडच्या बाकावर बसला होता. तो विचारात गढलेला असताना त्याच्या खांद्यावर एक हात आला. त्याने चमकून मागे पाहिले, तो कृष्णा होता. कृष्णा त्याच्या बाजूला बसला. त्या क्षणी सत्यजीतला आधाराची फार गरज होती. कृष्णाने त्याला धीर दिला, शांत केले आणि आपल्यासोबत येण्यास सांगितले. तोही मुकाट्याने उठला आणि त्याच्या मागे चालत राहिला. कृष्णा आधी त्याला आपल्या खोलीवर घेऊन आला, तिथे त्याची ट्रंक ठेवली आणि त्याला आराम करायला सांगून कामावर गेला. दुसऱ्या दिवशी कृष्णाने त्याला आपल्या सोबत नेले आणि मालकांशी गाठ घालून दिली. मालक भला माणूस होता आणि कृष्णा त्यांचा विश्वासू असल्याने त्यांनी सत्यजीतला लगेच कामावर रुजू करून घेतले. थोड्याच काळात तो तिथे रुळला आणि जुन्या कटू आठवणी विसरला. मात्र नियतीला त्याचे हे सुख मान्य नसावे. नोकरीत दीड-दोन वर्षे होत आली असतानाच त्याच्या तब्येतीने उचल खाल्ली. आधी उपचार घेतले पण सुधारणा झाली नाही, हे पाहून मालकांनी त्याला घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला. "खणखणीत बरा होऊन पुन्हा रुजू हो," असेही त्यांनी बजावले. सत्यजीत हिरमुसला असला तरी नाईलाज होता. त्या गोष्टीला आता नऊ-दहा महिने लोटले होते.
तब्येतीने खंगलेल्या बेकार पोराकडे पाहून त्याच्या आईने हाय खाल्ली आणि शेवटी त्यातच तिचे निधन झाले. कृष्णा कितीतरी वेळ सत्याचाच विचार करत होता, तोच दुपारी बाराच्या सुमारास मालकांनी पुन्हा कृष्णाला बोलावले.
"कृष्णा, आपल्याला एके ठिकाणी जायचंय, आताच निघायचंय, तू जेवून घे," मालक म्हणाले.
"नको मालक, मी येऊन जेवतो. तासाभरात तर परतणार आहोत आपण," कृष्णा बोलून गेला.
"नाही रे, यावेळी जरा लांब जायचंय, संध्याकाळ होईल यायला म्हणून म्हणतो जेवून घे," मालकांनी सांगितले आणि कृष्णा लगेच जेवायला गेला.
जेवून दोघे वाटेला लागले. तास दीड तासाचे अंतर कापल्यानंतर मालक म्हणाले, "इथून सत्यजीतच्या घराकडे गाडी वळव." कृष्णाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले पण क्षणात सावरला आणि म्हणाला, "मालक, इथून अजून दीड-दोन तास लागतील तिथं पोहोचायला आणि रस्ता खूपच खराब आहे."
"असू दे. तरीही चल; खूप प्रामाणिक पोरगा आहे तो. एवढे दिवस काम केलंय आपल्याकडे; अशा वेळी आपल्याशिवाय कोण मदत करेल त्याला?" मालक म्हणाले.
एका झोपडीवजा घरासमोर आलिशान गाडी थांबली. मालक उतरले आणि आत गेले. गुडघ्यात डोकं खुपसून रडणाऱ्या सत्यजीतने वर पाहिले. मालकांना पाहून तो गदगदला. मालक पुढे झाले, त्यांनी त्याला थोपटत सांत्वन केले आणि तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. "तू बरा झाल्यावर कधीही कामावर रुजू होऊ शकतोस," असा विश्वास त्यांनी दिला आणि जाताना थोड्या रकमेचे पुडके त्याच्या हातावर टेकवून निरोप घेतला. सत्यजीत दारापर्यंत आला. गाडी निघून गेली. शुल्लक कारणावरून हाकलपट्टी करणारा जुना मालक कुठे आणि कामावर नसतानाही कष्टाची जाणीव ठेवून घरापर्यंत येणारा हा नवा मालक कुठे, या विचाराने तो भारावून गाडी गेलेल्या दिशेकडे बघत राहिला!

अनु देसाई