गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (GSSC) होणाऱ्या नोकरभरतीमध्ये 'कोकणी' विषयाचे महत्त्व आणि त्यातील यशाची गुरुकिल्ली सांगणारा हा विशेष लेख.

गोवा राज्य स्टाफ सिलेक्शन तर्फे हल्ली नुकत्याच ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी जवळपास ३०० पेक्षा जास्त सरकारी नोकर भरती केली जात आहे. यात CBT 1 आणि CBT 2 असे परीक्षेचे स्तर आहेत. यात इंग्रजी विषयाला २० गुण आहेत, न्युमरिकल आणि रिझनिंग साठी ३० गुण आहेत, तर कोकणी या विषयासाठी १० गुण आहेत. ही परीक्षा कट ऑफच्या वर मार्कांनी उत्तीर्ण झाल्यास उमेदवाराला CBT 2 साठी एलिजिबल केले जाते.
गंमत अशी आहे की CBT 1 साठी विद्यार्थी फक्त न्युमरिकल आणि रिझनिंग वरच फोकस करतात आणि इंग्रजी आणि कोकणीकडे दुर्लक्ष करतात. इथेच चूक होते. ना धड इकडे गुण मिळतात ना धड तिकडे. त्यामुळे एकूण गुण कट ऑफच्या वर जात नाहीत. इंग्रजी या विषयासाठी विशिष्ट अभ्यासक्रम असल्याने त्याचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. परंतु कोकणी विषयाचा काय अभ्यास आणि तोही कसा करावा हा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांना पडलेला असतो.
गेल्या काही वर्षांखालील प्रश्नपत्रिका पाहिल्यास असे लक्षात येते की कोकणी विषयाचे असे काही प्रश्न असतात की मूळ गोमंतकीयालाच फक्त जमतील आणि समजून सोडवता येतील अशी कोकणी शब्दसमूहावर प्रश्न असतात. जवळपास सर्वच प्रश्न कोकणी म्हणींच्या शब्दसमूहावर विचारले जातात. कोकणी म्हणी आणि त्यांचा अर्थ खरंतर अस्सल गोमंतकीय ग्राहक/वाचक यांनाच समजू शकेल अशी त्या प्रश्नांची रचना असते.
फोंड्यातील स्टाफ सिलेक्शन मार्गदर्शन शिबिरात कोकणी भाषेचे अभ्यासक श्री. औदुंबर शिंदे यांच्याशी जेव्हा विद्यार्थ्यांचा संवाद झाला तेव्हा त्यांनी यातील यशाची गुपिते सर्वांसमोर ठेवली. आंतोनिया परेरा सरोंनी कोकणी भाषेला समृद्ध करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी 'कोकणी ओपारींचे भांडार' हे त्यांचे पुस्तक जर वाचले तर खूपशा न माहिती असलेल्या कोकणी गोमंतकीय शब्दांशी ओळख होते. 'द ट्रेझर ऑफ कोंकणी प्रोव्हर्ब्स' या २५० पानी पुस्तकाला नुसते चाळले तरी खूपशा जुन्या म्हणी, त्यात वापरलेले अस्सल पारंपारिक कोकणी शब्द यांची नव्याने ओळख होते. हे पुस्तक विद्यार्थ्यांनी अवश्य वाचल्यास १० पैकी १० गुण मिळण्याची खूप शक्यता निर्माण होते, असे अत्यंत उपयुक्त मत श्री. औदुंबर शिंदे यांनी मार्गदर्शनपर सत्रात व्यक्त केले.
ते जुने १९८५ साली छापलेले पुस्तक अनेक वाचनालयात उपलब्ध आहे. यामध्ये कोकणी म्हणींचा इंग्रजीमध्ये देखील स्पष्टीकरण केलेले आहे, त्यामुळे अर्थबोध होण्यास खूप मदत होते. या पुस्तकामध्ये डॉ. वी. पी. चव्हाण यांच्या पुस्तकाचा, मलया पुरुषोतम म्हण्यो, ‘कोंकणी बाशा’, डॉमिनोज मेंडिस यांचे ‘पुर्विल्ल्यो मुण्यो’, सरदेसाई यांचे ‘ओपारींची गिरेस्ताय’, सोळाव्या शतकातील ‘हाताळें’, ‘अमर कोकणी’, ‘कोंकणी म्हण्यो व गादयो’ या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. एकदम 'ऑथेंटिक' असे हे पुस्तक असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
प्रत्येक नैसर्गिक गोष्टींचा ऊन, वारा, पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, नदीचा आवाज, वाऱ्याची झुळूक व सोसाट्याचा वारा, रातकिड्यांचा आवाज इत्यादी गोष्टींसाठी काही खास गोमंतकीय कोकणी स्वरांचा, व्यंजनांचा, शब्दांचा, विशेषणांचा वापर केला जातो. याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे असे शिंदे यांनी आवर्जून सांगितले आहे. अडगळीत पडलेल्या काही कोकणी शब्दांवर नजर या पुस्तकातून मारता येते.
गोवा स्टाफ सिलेक्शन तसेच GPSC च्या अनेक पोस्टसाठी कोकणी टिपण अस्सल अनिवार्य आहे. कोकणीचे ज्ञान सुद्धा या पोस्टसाठी अनिवार्य आहे. याचा खूप फायदा होईल. त्यामुळे केवळ गणिती कौशल्यावर विसंबून न राहता, विद्यार्थ्यांनी कोकणी भाषेतील शब्दावली आणि म्हणींचा सखोल अभ्यास केल्यास १० पैकी १० गुण मिळवणे सहज शक्य आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांसोबतच कोकणीवर प्रभुत्व मिळवणे हे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिवार्य ठरते.

अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)