
साहित्य:
२ मोठ्या वाट्या भाजणीचे पीठ
पाव कप भिजवलेले पोहे
१ बारीक चमचा हळद,
१ बारीक चमचा ओवा
१ मोठा चमचा धने पूड,
१ बारीक चमचा जिरं
२ बारीक चिरलेले कांदे
आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा
चवीनुसार मीठ,
तेल आणि पाणी
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
एका मोठ्या परातीत भाजणीचे पीठ घेऊन त्यात भिजवून घेतलेले पोहे, हळद, ओवा, धने पूड, जिरं, बारीक चिरलेले कांदे, आलं-लसूण-मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र करावेत. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यावर त्यात थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घ्यावे. आपण यात भिजवलेले पोहे घातले असल्यामुळे पाणी अगदी जपून वापरावे, जेणेकरून पीठ जास्त मऊ किंवा जास्त घट्ट होणार नाही.
आता थालीपीठ थापण्यासाठी केळीचे पान घेऊन ते गॅसवर थोडी उब लावून हलके गरम करून घ्यावे, ज्यामुळे ते फाटणार नाही. पानाला थोडे तेल लावून त्यावर पिठाचा एक लहान गोळा ठेवावा आणि हाताने आवडीनुसार मध्यम आकारात थालीपीठ थापून घ्यावे. दुसरीकडे तवा चांगला तापत ठेवावा. तवा तापला की त्यावर थोडे तेल सोडून पानासकट थालीपीठ तव्यावर टाकावे. थोड्या वेळाने वाफेमुळे पान आपोआप सुटू लागते, तेव्हा ते हळूच काढून घ्यावे. आता वरून पुन्हा थोडे तेल सोडून थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस आणि खमंग भाजून घ्यावे. अशा प्रकारे तुमचे खुसखुशीत भाजणीचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे!

संचिता केळकर