वधूच्या घरी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर वरात वराच्या घरी परतते. वराने आपल्या घरासमोर उभ्या केलेल्या राजेशाही मांडवात पाऊल टाकण्यापूर्वी वधूची ओटी भरली जाते. गृहप्रवेशापासून ते जेवण ६वाढण्याच्या विधीपर्यंत प्रत्येक टप्प्यात माणुसकी आणि नात्यांचा ओलावा कसा जपला जातो, याचे हे सुंदर वर्णन.

वरच्या घरासमोर बांधलेल्या राजेशाही मांडवात वधूने पाऊल टाकण्यापूर्वी तिची ओटी भरतात. या ओटीचे वधूच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. तांदूळ, पाच नारळ, पाच पानांचा विडा, पाच केळी आणि विशेष महत्त्वाचे 'माटव वायल' यासह सासू तिची ओटी भरते. 'माटव वायल' म्हणजे सासरकडून स्त्रीच्या ओटीत घातलेली पहिली नऊवारी साडी. ही साडी हिरव्या रंगाचीच असावी असा अट्टाहास असायचा. हीच नऊवारी साडी नेसून पुढे वर्षभर वधूने सर्व सणवार आणि पूजा-अर्चा करायच्या असतात. कापड खांद्यावर ठेवून, पाच नारळाची ओटी एका कापडात बांधून ती वधूच्या पोटाला बांधली जाते. त्यानंतर वधू आणि इतर पाच स्त्रिया सासूसह लमण दिव्याच्या साक्षीने गृहप्रवेश करतात. या विधीला 'घर भरवणी' म्हणतात.
ज्या वेळी हे विधी चालू असतात, त्या वेळी 'घरणी' बाई गाते:
रुक्मिण पावली माटवाद्वारी
माटवाच्यो परी बघून रुक्मिण संतोषली
घोटयो भरिलो नाल्लानी
वल्ल्यो भरिलो साय सुनानी
सासू गे म्हणे सून गे येता
काय घर भरता
आपल्या कुलदेवा
रुक्मिण मारी सपे
माय मावाचे भाग्य
धुये गावुरशी
याचा अर्थ असा की, मांडवाचा राजेशाही थाट पाहून वधू आनंदित झाली. सासरच्या मंडळींनी नारळांनी ओटी भरून तिचे स्वागत केले. सासूने आनंदाने तिला घरात घेतले आणि कुलदेवाला नमस्कार करून आपल्या हाताचे 'सपे' (ठसे) घराच्या भिंतीवर उमटवले.
'घर भरवणी' झाल्यावर नववधू देवघरात जाऊन दर्शन घेते. त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन तिथल्या भिंतीवर उगाळलेल्या चंदनात हात बुडवून त्याचे 'सपे' लावते आणि खऱ्या अर्थाने या स्वयंपाकघराचा ताबा घेते. त्यानंतर ते चंदनाचे हात सासू-सासरे, दीर आणि जावा यांच्या हातावर ठेवून त्यांच्याशी प्रेमाने मिळून-मिसळून राहण्याचे वचन देते. या वेळी घरणी गाते:
गंधा धुपान तेला तुपान
रुक्मिण भरी हात आपल्या कुलदेवा
रुक्मिण मारी सपे सासूबाईंच्या बाणसा
पुढचा महत्त्वाचा विधी म्हणजे 'कांजण उचलणे'. तांब्याच्या घागरीवर तांब्याची कांजण ठेवली जाते, ज्यात सासू एखादा दागिना लपवते. सुनेने तो शोधून काढायचा असतो आणि हा दागिना सासू सुनेला आहेर म्हणून देते. या वेळी घरणी गाण्याच्या माध्यमातून नववधूला बोध देते. यात घराचे रक्षण करण्यासाठी उंदराचा बंदोबस्त करण्यासारखे घरगुती रूपक वापरले जाते. सासू आपल्या सुनेचे घराप्रती असलेले प्रेम पाहून तिला सोन्याचे मणी भेट देते. हा सासूने दिलेला आशीर्वादरूपी दागिना असतो.
त्यानंतरचा विधी म्हणजे आपल्या दिरांना जेवण वाढणे. नवीन आलेल्या भावजयीच्या हाताने पहिल्यांदाच जेवण जेवण्याची ही वेळ असते. सून कशी वाढते आणि तिच्यावर अन्नदानाचे काय संस्कार झाले आहेत, हे पाहण्याचा हा विधी. या वेळी घरणी गाते:
आई बाप्पांन दिले ताट
रुक्मिण उसापता भात
बलया बलया मामांजी
तुमचा गोत आमचा गोत सुने
आसा माटवात
अशा प्रकारचे खेळीमेळीचे वातावरण तयार करण्यासाठी हे विधी आजही गोव्यात केले जातात. दिव्याच्या उजेडाप्रमाणेच नववधूच्या मनातही प्रकाशाची जाणीव निर्माण व्हावी, हा यामागचा सुप्त हेतू असतो. 'सपे' मारताना होणारी स्पर्शाची देवाण-घेवाण मायेचा ओलावा निर्माण करते, तर 'कांजणी'तील दागिना शोधताना सासूचा धाक कमी होतो.
मुहूर्तमेढ रोवण्यापासून सुरू झालेली लग्नाची लगबग अशा प्रकारे रात्रीच्या जेवणाकडे येऊन थांबते. दुसऱ्या दिवशी हळकुंडाचे काकण उतरवून नवीन वर-वधूचा संसार सुरू होतो. सनातन संस्कृतीमधील सोळा संस्कारांत लग्न सोहळा हा गृहस्थाश्रमाची सुरुवात करणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नातील प्रत्येक विधी आणि त्या वेळी गाई जाणारी लोकगीते ही केवळ गाणी नसून नात्यांचे महत्त्व सांगणारी आणि मनोबळ देणारी स्तोत्रेच आहेत.

गाैतमी चाेर्लेकर गावस