शहरीकरणात हरवलेला गाव शोधणे जेवढे कठीण, तेवढेच ग्रामीण भागातील पारंपारिक पद्धती शोधणेही जिकिरीचे झाले आहे. सुमारे वीस वर्षांपासून बंद पडलेली गोव्यातील 'पुरण शेती' पुन्हा एकदा कशी जिवंत होत आहे, याचा आढावा घेणारा हा विशेष लेख.

गोव्याचा ग्रामीण भाग म्हणजे खरं तर आपल्या राज्याचे खरे वैभव. कौलारू घरे, घरापुढे शेणाने सारवलेले अंगण, पाणी थंड ठेवण्यासाठी वापरलेला मातीचा माठ, चुलीवर शिजवलेले चविष्ट अन्न आणि घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल तेल ही ग्रामीण भागातील खरी संपत्ती आहे. काणकोण, सांगे, सत्तरी आणि डिचोली-वाळपई सारख्या भागात ही संस्कृती आजही अनुभवायला मिळते, परंतु ती काही प्रमाणातच शिल्लक राहिली आहे.
अनेक वर्षांपासून नष्ट होत आलेली गोव्यातील अशीच एक पारंपरिक पद्धत म्हणजे 'पुरण शेती'. ही शेती विशेषतः सत्तरी आणि डिचोली भागात केली जायची. गेल्या दोन दशकांपासून ही पद्धत बंद पडली होती, परंतु ती पुन्हा जिवंत करण्यासाठी सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधव सरसावले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून धावे-सत्तरी आणि आजूबाजूच्या भागात पुरण शेतीला पुन्हा बळकटी मिळत आहे. गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक प्रकाश पर्येकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे.
पाणी अडवण्यासाठी नदीवर बांधलेले बंधारे हे पुरण शेती बंद पडण्यामागचे मुख्य कारण असल्याचे पर्येकर सांगतात. "ज्या वेळी गावात पुरण शेती केली जात होती, त्या वेळी नदीला पूर आला तरी पाण्याचे संकट गावापर्यंत पोहोचत नसे. पुरण शेती जणू गाव आणि नदीमधील संरक्षण भिंत होती. बंधाऱ्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि त्याचा थेट परिणाम पुरणवर झाला," असे त्यांनी सांगितले. यंदा साट्रे येथे तब्बल तीस वर्षांनंतर हा प्रयोग यशस्वी झाला असून त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सावर्डे-तार आणि केरी या ठिकाणीही ही शेती पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुरण शेतीची पद्धत खाजण शेतीपेक्षा खूप वेगळी असते. यामध्ये थेट नदीपात्रात भाताची लागवड केली जाते. पाषाणी दगडांचा तळ लागेपर्यंत जमीन खणली जाते आणि तिथे शेण, माती व कुजलेल्या पानांचे मिश्रण (कुसारे) घालून मशागत केली जाते. पाणी झिरपून दलदल निर्माण झाल्यानंतर भात लावणी केली जाते. पिकाचे रक्षण करण्यासाठी आणि नदीच्या पाण्याचा प्रवाह थोपवण्यासाठी झाडाच्या फांद्या व झावळ्या वापरून विशिष्ट कुंपण घातले जाते, ज्याला 'शितारी' असे म्हणतात.
ही शेती करण्यासाठी निसर्गाच्या चक्राचे विशेष ज्ञान आवश्यक असते. नद्यांचे बदलते प्रवाह आणि भरती-ओहोटीचा अंदाज घेणारे हे अनुभवी ज्ञान असणारी ज्येष्ठ मंडळी आता वृद्ध होत चालली आहेत. आधुनिकतेच्या प्रवाहात हे पारंपरिक कृषी ज्ञान काळाच्या पडद्याआड जाऊ नये आणि पुढील पिढीला आपल्या मातीतील या अनोख्या वारशाची ओळख व्हावी, हाच या पुनरुज्जीवनामागचा मुख्य हेतू आहे. ही शेती जरी आजच्या काळात मोठी आर्थिक संपन्नता देणारी नसली, तरी निसर्गाशी नाते जोडून कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके शुद्ध आणि सकस धान्य यातून नक्कीच मिळते. हा केवळ शेतीचा प्रकार नसून, तो आपल्या पूर्वजांनी जोपासलेली एक खडतर जीवनपद्धती आहे.
आज 'पुरण शेती' हा उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. कालबाह्य होत चाललेल्या पद्धतींचा पाठ्यपुस्तकांत समावेश करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रात्यक्षिक धडे घेण्याची संधीही मिळते. ही परंपरा जतन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रकाश पर्येकर यांचे अभिनंदन.

स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)