सुबोध लेवीला १० वर्षे सक्तमजुरी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th October 2021, 12:29 Hrs
सुबोध लेवीला १० वर्षे सक्तमजुरी

म्हापसा ः अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुबोध लेवी (भोपाल मध्यप्रदेश) यास १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दि. १९ ऑगस्ट २०१४ रोजी गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने सेक्रेट हार्ट विद्यालयाजवळ आरोपीस पकडले होते. त्याच्याकडून ०.४ ग्रॅम एलएसडी पेपर्स हा व्यावसायिक मादक पदार्थ जप्त केला होता. आरोपीविरुद्ध अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या २२(क) खाली गुन्हा नोंदवून अटक केली होती. अमली पदार्थविरोध विभागाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सीताकांत नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली होती.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद करून न्यायालयाने सुबोध लेवी यास आरोपी घोषित केले व त्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शिवाय १ लाखांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एका वर्षाची अतिरिक्त शिक्षा भोगण्याचा आदेशही दिला आहे. तसेच आरोपीने कोठडीमध्ये घालवलेला काळ या शिक्षेतून वजा करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. 

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. अनुराधा तळावलीकर यांनी, तर आरोपीच्या वतीने अॅड. एस. पिंटो दी सांताना यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.