मगोला युतीसाठी दरवाजे खुले : देवेंद्र फडणवीस

आमचं ठरलय, प्रमोद सावंतच मुख्यमंत्री !


13th October 2021, 11:56 pm
मगोला युतीसाठी दरवाजे खुले : देवेंद्र फडणवीस

फोटो : देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : आमचा निर्णय झाला आहे. पक्षाचा निवडणुकीतील चेहरा म्हणून डॉ. प्रमोद सावंत हेच असतील आणि तेच पुढचे मुख्यमंत्री असतील. कुठल्याही राजकीय पक्षात अंतर्गत मतभेद असू शकतात; पण आमच्या पक्षाचा संयुक्तिक आवाज हा एकच असायला हवा, असेही आम्ही आमदारांना सांगितले आहे. सर्व एकत्र आहेत आणि एकत्रपणेच पुढे जातील, असे भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
स्थानिक पक्षांसोबत युती करणे हे नेहमीच दोन्ही पक्षांना चांगले असते. पण म्हणून आम्ही युतीसाठी तगादा लावलेला नाही. गोव्यातील निवडणुका स्वबळावर लढून सरकार स्थापन करण्याचे आम्ही ठरवले आहे; पण मगो किंवा इतर समविचारी पक्षांना युतीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘गोवन वार्ता’शी साधलेल्या संवादावेळी गोव्यासह भाजपच्या इतर राज्यांतील स्थितीविषयी फडणवीस यांनी मोकळी चर्चा केली. बिहारमध्ये जनता दल युनायटेडशी युती होती. निवडणुकीत आम्ही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फायदा होईल अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या सभा आयोजित केल्या. रणनीती आखून काम केले आणि तिथे यश मिळाले. गोव्यासाठीही आम्ही रणनीती आखलेली आहे. त्याप्रमाणे काम होईल आणि भाजपला निश्चित २२पेक्षा अधिक जागाही मिळतील, असे फडणवीस म्हणाले.
पर्रीकर यांच्यासारखे नेते नाहीत याची उणीव असेल. पण विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रशासन व्यवस्थित हाताळत आहेत. तेच आमच्या पक्षाचा निवडणुकीचा चेहरा असतील. पुढचे मुख्यमंत्रीही तेच असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपशी एकनिष्ठ राहणाणाऱ्यांना योग्य वेळी योग्य ते पद मिळते. इथे सर्वांचा सन्मान होतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काही आमदार सरकार किंवा पक्षाला हानी पोहोचेल, अशी विधाने बाहेर करत असतात. या सर्वांशी माझी चर्चा झाली आहे. अंतर्गत मतभेद असतील किंवा गैरसमज असतील तर ते बंद दाराआड सोडवता येतात. लोकांना तुम्ही आश्वासक सरकार देत असता. त्यामुळे लोकांसमोर सर्वांचा एकच सूर असायला हवा, हा राजकारणाचा महत्त्वाचा नियम आहे. काही आमदारांचे काम इतके चांगले आहे की त्यांना चांगले भविष्य आहे. घाई करणे कोणासाठीच चांगले नसते. आमचे सर्व आमदार एकत्र आहेत. कोणीही कुठे जाणार नाही. सर्व एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जातील आणि पुढील सरकारही स्थापन करतील, असे फडणवीस म्हणाले.
--------
समविचारी पक्षांना दारे खुली
आम्ही कधीच कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे म्हटलेले नाही. स्वबळावर निवडणूक लढू शकतो, एवढा भाजप आज राज्यात प्रबळ आहे. पण समविचारी पक्षांशी युतीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. चर्चा होतील आणि त्यानुसार पुढे निर्णय घेतले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
---------

युती व्हावी हे माझे वैयक्तिक मत : माॅविन गुदिन्हो
मगोशी युती व्हावी हे माझे वैयक्तिक मत आहे; पण त्यावर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सुदिन ढवळीकर यांना पत्रकारांनी युतीविषयी विचारले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. गेले कित्येक दिवस ते चिंताग्रस्त होते; पण आता त्यांचा चेहरा प्रसन्न आहे. याचाच अर्थ त्यांना युती व्हावी की नको ते चांगले माहीत आहे. मी कोणी वरिष्ठ नेता नाही. माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, असे मत वाहतूकमंत्री माॅविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

हेही वाचा