दिल्लीतील बेकारी संपवा, मग गोव्याचा विचार करा!

मुख्यमंत्र्यांचा केजरीवालांवर निशाणा


23rd September 2021, 12:12 am
दिल्लीतील बेकारी संपवा, मग गोव्याचा विचार करा!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दिल्लीतील बेरोजगारी​ संपवा, त्यानंतरच गोव्याकडे लक्ष द्या. आपण कधीच सत्तेत येणार नाही हे माहीत असते, तेच लोकांना मोठमोठी आश्वासने देत असतात असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल गोमंतकीयांना नोकऱ्यांबाबत विविध आश्वासने देत आहेत. यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना छेडले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील किती लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत, त्याचा आकडा जाहीर करावा. त्यानंतरच गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन द्यावे. केजरीवाल नोकऱ्यांबाबत जनतेला जी आश्वासने देत आहेत, ती आपल्या सरकारने याआधीच पूर्ण केली आहेत. राज्यातील आयटीआय कॉलेजमधून कौशल्य शिक्षण दिले जात आहे. मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून सरकारने अनेकांना खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. याचा केजरीवाल यांनी अभ्यास करावा.
कोविड काळात आर्थिक परिस्थिती​ बिकट असतानाही सरकारने साधनसुविधा उभारणी सुरूच ठेवली. कृषी, फलोत्पादन, पशुपालन आदींसारख्या क्षेत्रांत अनुदान दिले. विद्यार्थ्यांना फीमध्ये कपात करून दिलासा दिला. सामाजिक योजना सुरू ठेवल्या. मोफत पाणी मिळवून दिले. त्यामुळे जनता निश्चित आपल्यावरच विश्वास ठेवेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
...............................................
तृणमूलला गोवा आवडत असावा!
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तृणमूल काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारले असता, गोवा सर्वांनाच आवडतो. त्यामुळेच कदाचित तृणमूल काँग्रेसने हालचाली सुरू केल्या असाव्यात, असे उत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा