सहा दिग्गजांचा तालुके जिंकण्यासाठी आटापिटा!

मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री आणि दोन आमदारांचा समावेश


22nd September 2021, 11:44 pm
सहा दिग्गजांचा तालुके जिंकण्यासाठी आटापिटा!

फोटो : बाबूश मॉन्सेरात,
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वच पक्षांकडून सुरू झालेली असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह तीन मंत्री आणि एका आमदाराकडून आपापल्या तालुक्यातील सर्वच मतदारसंघ काबीज करून पक्षात आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच संबंधित मतदारसंघांत पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठीच्या हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत.
साखळीचे आमदार असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली तालुक्यातील साखळीसह डिचोली आणि मये हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडेच ठेवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. त्यासाठी दोन्ही मतदारसंघांत जिंकून येऊ शकणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या दोन्ही ठिकाणचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी अनेक महिन्यांपासून सुरू केली असून, अनेक नावांवर विचारविनियम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपसह स्वत:च्या सहकारी मंत्री आणि आमदारांना वारंवार ‘घरचा आहेर’ देत असलेले मंत्री मायकल लोबो तालुके काबीज करण्याच्या प्रयत्नात आघाडीवर आहेत. कळंगुटचे आमदार असलेले मायकल लोबो बार्देश तालुक्यातील कळंगुटसह म्हापसा, थिवी, पेडणे, मांद्रे, शिवोली, हळदोणा, साळगाव आणि पर्वरी या नऊही मतदारसंघांत स्वत:चा एकछत्री राजकीय अंमल प्रस्थापित करू पाहत आहेत. बार्देशमधील किमान सहा मतदारसंघ आपण भाजपकडे ठेवू शकतो. पण त्यासाठी पक्षाने या नऊही मतदारसंघांत उमेदवार देताना आपले मत जाणून घ्यावे, अशी मागणीही ते करत आहेत. याशिवाय स्वत:ला कळंगुट आणि आपल्या पत्नीला शिवोलीची उमेदवारी दिल्यास काँग्रेसला आपण या सहा जागा जिंकू देऊ शकतो, असा प्रस्तावही त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पणजीतील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन भाजपात गेलेल्या आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपात दाखल होताच तिसवाडीतील पणजीसह ताळगाव, सातांक्रूझ, सांतआंद्रे आणि कुंभारजुवे हे पाचही मतदारसंघ आपल्याकडे म्हणजेच भाजपकडे आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी त्यादिशेने कामही सुरू केले आहे. नुकतीच भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनाही बाबूश यांनी हीच हमी दिल्याचेही समजते. आरोग्यमंत्र्यांनी येत्या निवडणुकीत सत्तरी तालुक्यातील वाळपईसह पर्येही आपल्या ताब्यात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पर्येची उमेदवारी आपल्या मर्जीतील व्यक्तीलाच मिळेल यासाठीची फिल्डिंगही ते लावत असल्याचे दिसून येत आहे.
दाबोळीचे आमदार आणि मंत्री असलेल्या मॉविन गुदिन्हो यांनी सध्या सासष्टीतील दाबोळीसह कुठ्ठाळीवर तूर्त लक्ष केंद्रित केले आहे. या दोन मतदारसंघांशिवाय सासष्टीतील इतर मतदारसंघांतही​ आपल्या मर्जीतील उमेदवार ठेवण्यात यावेत, यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्याचेही समजते.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्यास डॉ. प्रमोद सावंतच मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सर्वांनाच वाटत आहे. पण, केंद्रातील भाजपने गेल्या काही महिन्यांत घेतलेले निर्णय पाहून लोबो, मॉविन, आरोग्यमंत्री आणि आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्यातील मुख्यमंत्रिपदाची​ आस वाढली आहे. त्यासाठीच हे नेते आपापल्या तालुक्यांतील बहुतांशी मतदारसंघ आपल्याकडे ठेवून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सूत्रांकडून समजते.
.............................................

फोंड्यासाठी सुदिनही आक्रमक
भाजप मंत्री, आमदारांसोबतच मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनीही येत्या विधानसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यात मडकईसह फोंडा, प्रियोळ आणि शिरोड्यात मगोचेच आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. निवडणुकीआधी किंवा नंतर मगोची इतर पक्षांसोबत युती झाली तर आपले वजन वाढवण्यासाठी सुदिन यांना हे मतदारसंघ मगोच्या ताब्यात ठेवणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.