कोविडबळी कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदतीचे वितरण

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : मानसिक आधारही देण्याची ग्वाही


22nd September 2021, 11:43 pm
कोविडबळी कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदतीचे वितरण

फोटो : कोविडबळीच्या कुटुंबियांना मदत वितरित करताना मुख्यमंत्री.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबिना दोन लाख रुपयांची अार्थिक मदत देण्यासह सरकार भावनिक आधार देण्याचाही प्रयत्न करत आहे. त्या त्या भागातील नगरसेवक त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची आर्थिक तसेच मानसिक स्थितीही जाणून घेत आहेत. सरकारने नगरसेवकांकडे कोविडबळीच्या कुटुंबियांचा अहवाल मागितला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कोविडबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी मान्यतापत्रांचे बुधवारी एका कार्यक्रमात वितरण करण्यात आले. यावेळी पारंपरिक व्यावसायिकांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदतही वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक आणि खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.
कोविडबळीच्या कुुटुंबियांना दोन लाखांची मदत देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचीही गरज आहे. समाज कल्याण खात्याच्या सचिवांनी नगरसेवकांसमवेत बैठक घेतली आहे. प्रत्येक नगरसेवकाकडे 20 घरांना भेटी देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण स्थिती समजून घेऊन ते अहवाल सादर करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खाजेविक्रेते, फुलांचे विक्रेते अशा पारंपरिक व्यावसायिकांना ५ हजार रुपयांची अार्थिक मदत देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. कोविड काळात सरकारचा महसूल घटला. तरीदेखील सरकारने सामाजिक योजना सुरूच ठेवल्या. महाविद्यालयांच्या शुल्कातही सरकारने सूट दिली. मूलभूत सुविधा उभारण्याची कामेही सुरूच आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांनीही समयोचित विचार मांडले. कोविडबळीच्या कुटुंबियांसाठीच्या योजनेसाठी ४५०, तर पारंपरिक व्यावसायिकांच्या योजनेसाठी २,६०० अर्ज आले होते.

हेही वाचा