तृणमूलच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न

प्रशांत किशोर यांच्या संस्थेतर्फे गोव्यात सर्व्हे : लुईझिन, रेजिनाल्ड, आग्नेल यांच्या भेटी


22nd September 2021, 12:40 am
तृणमूलच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, समविचारी पक्षांसोबत युती करण्याबाबत काँग्रेसने दाखवलेली अनास्था यामुळे गोव्यात तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली गोव्यात समविचारी पक्षांची तिसरी आघाडी उघडण्याची शक्यता आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’ या संस्थेचा गोव्यात अभ्यास सुरू असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस अशा अनेक नेत्यांशी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधला आहे. गोव्यातील काही स्थानिक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच आम आदमी पक्ष अशा समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काही नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
लुईझिन फालेरो यांना यासंबंधी विचारले असता, तृणमूल काँग्रेसचा विषय नव्हता पण ‘आयपॅक’चे काही लोक मला येऊन भेटले. आमच्या राज्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही सर्व्हेच्या निमित्ताने आलेल्या लोकांनी आपली भेट घेतली असल्याचे सांगितले.
दरम्यान, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीच गोव्यात तिसरी आघाडी उघडावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोव्यातील स्थानिक पक्षांच्या नेत्यांनीही काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती; पण गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन होण्याबाबत एकाही नेत्याने स्पष्टपणे बोलण्याची तयारी दर्शवली नाही.
__
तृणमूलसोबत आप, राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता
ममता बॅनर्जी यांच्या भाजपविरोधी भूमिकेबाबत देशभर सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे काँग्रेसने समविचारी पक्षांना डावलले तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी तयार झाली तर त्यांच्यावर मतदार विश्वास ठेवू शकतात, असे स्थानिक पक्षाच्या अध्यक्षाने स्पष्ट केले. आम आदमी पक्ष काँग्रेससोबत जाण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना, तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले तर आम आदमी पक्ष तृणमूल काँग्रेसशी युती करू शकतो. राष्ट्रवादी पक्षही सोबत येऊ शकतो. त्यामुळे गोव्यात तिसरी आघाडी स्थापन होऊ शकते, असे मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले.

हेही वाचा