म्हापशात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

संशयित शिक्षकाला अटक; ७ दिवसांची पोलीस कोठडी


22nd September 2021, 12:33 am
म्हापशात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : शिकवणी घेण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाने सात वर्षीय चिमुकलीवर लैैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बार्देश तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित शिक्षक संजय हिर्लेकर (४७) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शनिवार, दि. १८ रोजी रात्री ८.१५ ते ९.४५ या वेळेत घडला. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. संशयित मुलांची त्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेत होता. बार्देशमध्ये एका इमारतीत राहणार्‍या फिर्यादीने आपल्या सात वर्षीय मुलीला शिकवणी देण्यासाठी संशयिताशी संपर्क साधला होता. पाच-सहा दिवसांपासून तो फिर्यादीच्या घरी जाऊन पीडितेची शिकवणी घेत होता. घरातील एका खोलीत शिकवणी वर्ग सुरू होता. शिकवणीवेळी खोलीत संशयित ‌आणि पीडित दोघेच असायचे. संशयित शिक्षकाने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाला बोलल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला दिली.
सोमवार, दि. २० रोजी रात्री पीडित मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. संशयित रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घरी येताच फिर्यादीने जाब विचारला व पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भा.दं.सं.च्या कलम ३५४, ३५४(अ), ३७६ अ ब, ५०९, ५०६ (२), गोवा बाल कायदा कलम ८ व पोक्सो कायदा कलम ४, ८, १० व १२ खाली गुन्हा दाखल केला व संशयितास अटक केली. म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने संशयितास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा