१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणावेत : आयटीमंत्री रोहन खंवटे

गोव्याचे पर्यटन व माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंगच्या वापरावर पूर्ण बंदीऐवजी कडक निर्बंध आणण्याची मागणी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणावेत : आयटीमंत्री रोहन खंवटे

पणजी : वाढत्या डिजिटल युगात लहान मुलांमधील सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंगचे व्यसन हा एक गंभीर सामाजिक आणि कौटुंबिक विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर, १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर आणि विशिष्ट ऑनलाईन गेम्सवर पूर्णपणे बंदी न घालता योग्य ते कायदेशीर निर्बंध आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोव्याचे पर्यटन व माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून तातडीने कायदेशीर पावले उचलण्याची विनंती केली आहे.

रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले की, आजच्या डिजिटल जगात १६ वर्षांपर्यंतच्या मुलांनी तंत्रज्ञान, गुगल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केवळ शैक्षणिक प्रगती आणि ज्ञानार्जनासाठी केला पाहिजे. मात्र, सध्या अनेक मुले आपला महत्त्वाचा वेळ ऑनलाईन गेम्स, रील्स आणि अनावश्यक सोशल मीडिया हँडल्सवर वाया घालवत आहेत. या काळात मुलांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या शिक्षण आणि भविष्यातील करिअरवर केंद्रित असणे गरजेचे असते. ऑनलाईन विश्वातील या व्यसनामुळे मुलांचे होणारे मानसिक व शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने नियमन करणे गरजेचे आहे. भारतातील एक मूल दररोज सरासरी १ तास ४५ मिनिटे ते २ तास ऑनलाईन गेमिंग आणि सोशल मीडियावर घालवते, हा आकडा अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली असून लवकरच नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील अनेक देशांनी आधीच अशा प्रकारचे कायदेशीर निर्बंध लागू केले असून भारत हा जगातील सर्वांत तरुण देश असल्याने आपणही अशी पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या बाजूला, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील तरुणांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती खंवटे यांनी दिली. गेल्या काही वर्षांत लाँच झालेला 'गोवा युवा चॅप्टर' उपक्रम आता गोव्यातील ७५ हून अधिक कॉलेजांमध्ये पसरला आहे. पर्यटन हा गोव्याचा मुख्य आर्थिक आधार असल्याने तरुणांनी नोकरी शोधणाऱ्यांऐवजी 'जॉब गिव्हर्स' (नोकरी देणारे) बनले पाहिजे. मग त्यांनी क्युलिनरी, वेलनेस किंवा ॲडव्हेंचर क्षेत्रात करिअर निवडावे किंवा पर्यटनात स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, यासाठी सरकार मार्गदर्शन करत आहे.

आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संपूर्ण व्यावसायिक चित्र बदलत असली, तरी त्यासोबत मानवी स्पर्श टिकून राहणे तितकेच गरजेचे आहे. गोव्यातील तरुणांकडे ऊर्जा, उत्साह आणि स्थानिक समस्या सोडवण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. शेतकरी, कारागीर, मच्छीमार, होमस्टे चालवणाऱ्या व्यक्ती, टॅक्सी चालक किंवा पर्यटक यांच्याशी संवाद साधल्यास प्रत्यक्ष अडचणी समजतात आणि त्यातूनच नवीन 'स्टार्टअप आयडिया' जन्म घेतात. तंत्रज्ञान आणि AI चा योग्य वापर करून जीवन सुलभ करता येते. गोव्यातील तरुणांमधील टॅलेंट ओळखू त्यांना योग्य समुपदेशन आणि मेंटरिंग मिळाले, तर ते केवळ पर्यटनातच नव्हे तर इतर विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर करून मोठी प्रगती करू शकतात, असा विश्वास रोहन खंवटे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा
सर्व पहा