वाळपई मार्केट पार्किंग भागात पेट्रोल, सुट्या भागांची चोरी

तक्रारी करूनही दुर्लक्ष; सुरक्षा व्यवस्था नसल्याने प्रकार वाढले

|
20th September 2021, 11:21 Hrs
वाळपई मार्केट पार्किंग भागात पेट्रोल, सुट्या भागांची चोरी

पार्किंगच्या जागेमध्ये चोरी होत असल्यामुळे दुचाकीस्वार अशाप्रकारे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते.      

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई :
नगरपालिकेच्या वाळपई मार्केट प्रकल्पाखाली असलेल्या पार्किंगच्या जागेमधील दुचाकींचे पेट्रोल चोरी होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे दुचाकीस्वारांनी नाराजी व्यक्त केली असून नगरपालिकेने यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे गाड्यांचे सुटे भाग चोरण्याचे प्रकारे वाढू लागलेले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, वाळपई शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मार्केट प्रकल्पाच्या खाली पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यात येत असते. खास करून सरकारी व खासगी आस्थापनात काम करणारे कर्मचारी त्या ठिकाणी गाड्या पार्क करून कामावर जात असतात. या ठिकाणी सुरक्षेची चोख व्यवस्था नसल्यामुळे त्याचा फायदा घेऊन चोरटे गाड्यांचे पेट्रोल काढीत असतात. आतापर्यंत अनेक प्रकारच्या तक्रारी या संदर्भाच्या आलेल्या आहेत.
याबाबतची माहिती नगरपालिकेला देण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे त्या ठिकाणी दुचाकीचालक गाड्या पार्क करत नसल्यामुळे रस्त्यावर पार्किंग करीत आहेत. परिणामी शहरातील मार्केट प्रकल्पासमोर दुचाक्यांची पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पार्किंगच्या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात येत असलेल्या गाड्यांचे सुटे भाग सुद्धा चोरीला जाऊ लागलेले आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी समोर आल्या असून याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी दुचाकीस्वारांनी केली आहे. अन्यथा मार्केट प्रकल्पाखाली असलेली पार्किंगची जागा फक्त शोभेची वस्तू ठरणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दुचाकीस्वार संजय गावस यांनी सांगितले की, अनेकवेळा आपल्या गाडीच्या पेट्रोलची चोरी झालेली आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या असताना सुद्धा त्याकडे अजिबात लक्ष देण्यात आलेले नाही. या पार्किंगच्या जागेत अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पेट्रोलची चोरी करीत आहेत. यामुळे दुचाकीस्वारांना चांगलाच फटका बसत आहे.
दुसरे एक दुचाकीस्वार महादेव गावडे यांनी सांगितले की, आपल्या मोटारसायकलचे सुटे भाग यापूर्वी चोरीला गेलेले आहेत. यामुळे पालिकेने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
पूर्णवेळ सुरक्षा व्यवस्था करणार : नगराध्यक्ष
वाळपईच्या नगराध्यक्ष सेहझीन शेख यांच्याशी बाजार प्रकल्पाच्या पार्किंग जागेत होणाऱ्या पेट्रोल चोरी आणि गाड्यांच्या सुट्या भागांच्या चोरीबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. अनेकवेळा या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येते, मात्र कायमस्वरूपी नियुक्ती करणे शक्य नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. मात्र या संदर्भातील गांभीर्याने दखल घेऊन यापुढे पूर्णवेळ सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याचा विचार करण्यात, येईल असे आश्वासन दिले आहे.