पूरग्रस्तांची मागणी : प्राथमिक स्तरावर तत्काळ मदत मिळणे आवश्यक
घरामधील चिखल काढताना ग्रामस्थ.
डिचोली : तालुक्यातील पाळी-भामई, आमोणा, कारापूर, पिळगाव आदी अनेक भागांत शेकडो घरांत पुराचे पाणी शिरले. अनेकांचे संसार बुडाले, त्याबरोबरच सर्व कागदपत्रेही वाहून गेली किंवा खराब झाली. अशा परिस्थितीत केवळ कागदपत्रे नाहीत म्हणून पूरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही. त्यांना लालफितीच्या कारभारात अडकवण्याऐवजी तत्काळ मदत करण्यात तत्परता दाखवावी, अशी मागणी पूरग्रस्त भागांतील ग्रामस्थांनी केली आहे.
या ठिकाणी तलाठी व पंचायत मंडळ, मामलेदार, उपजिल्हाधिकारी आदी कार्यालये सक्रिय सेवा देत आहेत. मात्र मदत देण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे लागतात ती सर्व आणि आधार कार्ड, रेशन कार्ड आदी दाखले पुरात वाहून गेले आहेत. ते कुठून सादर करायचे, असा सवाल पंच महेश गावस यांनी केला आहे. सरकारने आधी संसार उभे करताना त्वरित मदत करून सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत लक्ष द्यावे, अशी मागणी गावस यांनी केली आहे.
केवळ डिचोली तालुक्यातीलच नव्हे तर सत्तरीसारख्या इतर पूरग्रस्त भागातील पंचायती, सरपंच, पंच, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, सरकारी यंत्रणा विविध माध्यमातून सहकार्य देत आहेत. अनेक सामाजिक संस्था पूरग्रस्त भागांत वस्तूंचे वाटप करीत आहेत. त्याचे योग्य नियोजन व्हावे व गरजवंतांना मदत पोहोचावी याकडेही लक्ष दिले जात आहे. भांडी, कपडे, पाणी, धान्य आदींचे वितरण होत आहे. जी घरे पडली आहेत, ती उभी करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक संस्थाही पुढे येत आहेत. अनेक कुटुंबांना इतर ठिकाणी आसरा घेण्याची पाळी आली आहे. नेटवर्क उपलब्ध नसल्याने ऑनलाइन शिक्षण ठप्प झाले आहे. मुलांची पुस्तके वाहून गेल्याने अडचण झाली आहे.
पूरग्रस्त भागांतील ज्या लोकांची कागदपत्रे वाहून गेली आहेत, भिजली आहेत, त्यांना कागदपत्रांसाठी सक्ती करू नये. सर्व ती मदत करावी, अशी मागणी पूरग्रस्त भागातील नागरिकांकडून होत आहे.