कळणे मायंनिग भागातील बंधारा फुटून पूरसदृश स्थिती

घरे, शेती, बागायतींचे कोट्यवधींचे नुकसान


30th July 2021, 12:58 am
कळणे मायंनिग भागातील बंधारा फुटून पूरसदृश स्थिती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या कळणे खनिज प्रकल्पाला बहुतांश ग्रामस्थांचा विरोध होता. कळणे मायंनिगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा करून ठेवलेल्या मायनिंग भरावाला भगदाड पडून पूरसदृश स्थिती निर्माण झाली. चिखल पाणी परिसरातील घरांत शिरले. घाबरून लोक सैरावैरा पळत सुटले. केवळ तीन तासांतच होत्याचे नव्हते झाले. घरे, शेती, बागायती यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
कळणे मायनिंगमधून गुरुवारी सकाळी ७.३० वाजता काही प्रमाणात भगदाड पडून पाणी रस्त्यावर आले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात डोंगराला शंभर मीटर लांब सत्तर मीटर खोल भगदाड पडून खाणीतून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून पूरस्थिती निर्माण झाली. खाणीतून कानठळ्या बसवणारा आवाज आला. कळणे मायंनिग मधून पाणी घराच्या दिशेने येत असताना लोक सैरावैरा पळत सुटले. धवडकी वाडीतील घरामागून प्रंचड लोट वाहून येत असल्याचे लक्षात येताच तेथे आलेले दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, पंच अजित देसाई, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, गणपत देसाई, एकनाथ नाडकर्णी, संजय विर्नोडकर, आनंद देसाई, मिलिंद नाईक, पत्रकार तुळशीदास नाईक व ग्रामस्थांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. थोड्याच वेळात घरात, शेतात खनिज माती, पाणी शिरले. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.