तार नदीतील गाळ उपसण्यासाठी रोखले महामार्गाचे काम

कंत्राटदाराने पालिकेला हमी दिल्यानंतर कामास मुभा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st July 2021, 11:49 pm
तार नदीतील गाळ उपसण्यासाठी रोखले महामार्गाचे काम

राष्ट्रीय महामार्गावर तार पुलाचे बांधकाम बंद पाडताना रहिवाशांसह नगरसेवक प्रकाश भिवशेट.

म्हापसा : राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम करताना तार नदीत टाकलेला मातीचा भराव व इतर टाकाऊ साहित्य काढण्यास कंत्राटदारास अपयश आल्याचा ठपका ठेवत, पुलावर काँक्रीट स्पॅन उभारण्याचे सुरू केलेले काम स्थानिक नगरसेवक प्रकाश भिवशेट व रहिवाशांनी पुन्हा बंद पाडले. दरम्यान नदीतील गाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत काढण्याची हमी कंत्राटदाराने पालिकेला दिल्यावर काम करण्याची अनुमती देण्यात आली.
गावसावाडा येथील रहिवाशांसह नगरसेवक भिवशेट यांनी काम बंद पाडल्याचे समजताच आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेवक तारक आरोलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार व नगराध्यक्ष यांनी स्थानिक व कंत्राटदाराचे म्हणणे ऐकून घेतले.
पुलाच्या बांधकामावेळी नदीच्या पात्रात कंत्राटदाराकडून मातीचा भराव टाकण्यात आला होता. या मातीसह इतर टाकाऊ बांधकाम साहित्य न काढताच पुलावर स्पॅन बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यामुळे दहा दिवसांपूर्वीच नगरसेवक भिवशेट व स्थानिकांनी हे काम बंद पाडले होते. पण नदीतील हा गाळ काढण्याचे आश्वासन देऊन लगेच काम कंत्राटदार कंपनीने पुन्हा हाती घेतले होते. गाळ उपसा न करता पुलाचे बांधकाम हाती घेतल्यामुळे मंगळवारी व बुधवारी नगरसेवक भिवशेट व रहिवाशांनी पुन्हा हे बांधकाम बंद पाडले. नदीच्या प्रवाहातील अडथळा दूर करण्यासाठी टाकाऊ साहित्य काढण्यासह नदी किमान दीड मीटर खोदून द्यावी, अशी मागणी यावेळी भिवशेट यांनी केली.
दरम्यान, आता पावसामुळे नदीतील गाळ काढणे शक्य होणार नाही. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये गाळ काढू, अशी हमी कंत्राटदार कंपनीने दिली. तसेच आमदार डिसोझा व पालिकेला येत्या २० दिवसांत याबाबतचे लिखित हमी पत्र सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नदीतील टाकलेला गाळ उपसा न करताच कंत्राटदाराने पुलाचे अंतिम काम हाती घेतले होते. म्हणूनच आम्ही काम बंद पाडले होते. आधी गाळ काढा, नंतर बांधकाम करा, अशी आमची मागणी हाती. शेवटी कंत्राटदाराने गाळ काढण्याची हमी दिल्याने कामाला अनुमती देण्यात आली आहे. - प्रकाश भिवशेट, नगरसेवक