Goan Varta News Ad

छत्री आणि रेनकोट

छत्री म्हणजे तेव्हा एक लोढणेच वाटायचे, घेऊन फिरताना. ‘हिरोने कधी छत्री घेऊन फिरायची असते काय?’ अशी वरून प्रौढी दाखवायची.

Story: मिश्किली । वसंत भगवंत सावंत |
17th July 2021, 11:43 Hrs
छत्री आणि रेनकोट

‘अ हो, तब्बल दोन वर्षे झाली,  हिच छत्री वापरतो मी,’ मित्र ऐटीत म्हणाला तेव्हा हसूच आले आम्हाला, त्याच्या फुशारकीचे. येथे तर पाचपाच वर्षे एकच छत्री वापरणारे बहाद्दर आहेत, वरून ते आपली छत्री ‘अनुभव संपन्न’म्हणून सांगतात अभिमानाने, तुमच्या छत्रीपेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत माझ्या छत्रीने,अशा अर्थाने. भले ती ‘सतरी’ आता ‘बोतरी’ झाली असली तरी काय झाले?

आम्ही त्या मित्राला वेड्यात काढल्यावर त्याने आपले स्पष्टीकरण दिले, मजेशीर. अहो, दर वर्षी छत्री हरवण्याचा विक्रम होता माझ्या नावावर, पूर्वीपासून,  पाऊस सुरु होताच घेतलेली छत्री पावसाळा संपण्याआधी हरवलेलीच असायची, त्या वार्षिक पराक्रमाची आठवण काढीत टवाळीच केली माझी, घरच्या मंडळीने.

आश्चर्य वाटल्यासारखे भासवले सगळ्यांनी, माझ्या हातात जूनीच छत्री पाहून. तसा त्यात माझा पराक्रम नव्हताच काही, सगळी करोनाची कृपा.

गेल्या वर्षी नवीछत्री घेतली खरी पण घरीच बसावे लागले महामारीच्या धाकाने. करोनाने नुकसान करो कुणाकुणाचे, या बाबतीत मात्र दिलासा दिला मला.मित्राच्या या स्वयं-व्यंगावर हसलो आम्ही बरेच,

पण पावसाच्या आठवणीही ढगाळून आल्या एकएकट्याच्या मनात.

मग हास्याच्या सरीच लागल्या कोसळू, प्रत्येकाचे अनुभव ऐकताना. 

आम्ही खरोखर पोट धरधरून हसलो मात्र,  हे दोन किस्से ऐकताना.

एका मित्राने आपल्या पहिल्या रेनकोटची धमाल गंमत सांगितली,

खेडे गावातील या मित्राची शाळा खेड्यातच होती, घरा जवळच 

याने म्हणे रेनकोट कसा असतो ते पाहिलेच नव्हते, शाळेत जाण्याअगोदर

घरची मंडळी घोंगडे-कांबळ वापरायची, शेता परसात काम करताना,

चुकून कुणाकडे छत्री असायची, तीही लाकडी दांडेवाली, 

गुरांच्या मागे फिरताना मुलांना  “खोळ” द्यायचे,‘कापेत’ ही म्हणायचे त्याला, हाताने अंगाला लपेटत डोक्यापासून पाठीवरून सरळ पायाकडे जाणारे शाळेत जायला लागल्यावर या मित्राला लाज वाटू लागली, आपल्या‘खोळाची’

बरीच मुले झबल्यासारखे रेनकोट मिरवत यायची, डोक्यावर टोपी असलेले.

अन बऱ्याचदा चिडवायचीही या खेडवळ मित्रांना, त्यांचे गांवठी रेनकोट पाहून.साहजिकच न्यूनगंड शिरला मित्राच्या मनात, आणि त्याने म्हणे हट्टच धरला,

“ तसला रेनकोट नाही दिला तर शाळेतच नाही जाणार”असा,

शेवटी नाईलाजाने घरच्या मंडळीने बाजारातून आणला रेनकोट त्याच्यासाठी.

मित्र म्हणाला, काय आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला तो रेनकोट पाहून !

आणल्या आणल्या चढवला तो काढायचच नाही अशा  तयारीने,

 रेनकोट घालूनच खेळायला गेलो सवंगड्याबरोबर, पाऊस नसतानाही.

रात्रीचे जेवण घेतानाही काढला नाही,घरची मंडळी ओरडली तरी.

चक्क झोपतानाही मित्राच्या अंगावरच होता म्हणे तो रेनकोट.

दुसऱ्या दिवशी सकाळी आईने याला दुध घेऊन पाठवले, सावकाराच्या घरी,

येताना बेकरीवरून पावही आणले त्याने, रेनकोटची ऐट मिरवतच.

रेनकोट घालूनच चहा-नाश्ता केला, आणि दप्तर घेऊन धूम ठोकली शाळेत 

सगळया मुलांनी वर्गा बाहेर ठेवले होते,  आपआपले रेनकोट-छत्र्या,

हा मात्र रेनकोट घालूनच बसला बाकावर, बाकीची मुले हसत होती तरी.

गुरुजी आल्यावर मात्र याला बोलणी खावी लागली,

रेनकोट बाहेर ठेवण्याचा हुकुम दिला गुरुजींनी, तेव्हा ह्याच्यावर आभाळ कोसळले.

गुरुजींना म्हणाला “ मी जरा घरी जाऊन येतो लगेच”

गुरुजी ओरडले “काही गरज नाही घरी जाण्याची, ठेव बाहेर व्हरांड्यावर,

तेव्हा ह्याला सत्य परिस्थिती सांगावीच लागली गुरुजींना, 

काल संध्याकाळी मोठ्या उत्साहाने त्याने चढवला होता खरातो रेनकोट,

पण त्यावेळी म्हणे त्याच्या  अंगावर दुसरे कोणते वस्र नव्हतेच, नेहमीप्रमाणे.

रेनकोट अंगावरून न उतरवल्याने त्याची कल्पनाही नाही आली त्याला.

आता शाळेत आल्यावरच  जाणीव झाली त्याला या  गोष्टीची,

आपल्या अंगात सदराही नाही आणि चड्डीही नाही,  याची. 

मोठी पंचाईत झाली बिचाऱ्याची, गुरुजींचा हुकुम ऐकून.

शेवटी गुरुजींनी पाठवलेच याला घरी, कपडे घालून यायला 

पण वर्गात मात्र फजतीच केली ह्याची,वर्गात ती गंम्मत सांगून.

आम्हीही मनमुराद हसलो,मित्राने सांगितलेला  हा किस्सा ऐकून.

दुसऱ्याने सांगितलेला किस्सा‘रोमँटिक’ स्वरूपाचा होता.

म्हणाला,  गोष्ट आहे तरुणपणीची, नुकताच नोकरीला लागलो होतो,

छत्री म्हणजे तेव्हा एक लोढणेच वाटायचे, घेऊन फिरताना. 

‘हिरोने कधी छत्री घेऊन फिरायची असते काय?’ अशी वरून प्रौढी. 

आलाच पाऊस तर वाट पाहायची थांबण्याची किंवा घुसावे कुणाच्या तरी छत्रीत.

त्या दिवशी ऑफिस सुटल्यावर बस मधून उतरून घरी जायला निघाला म्हणे हा, तर पाऊस सुरु झाला जोराचा, बराच वेळ झाला थांबण्याची चिन्हेच  दिसेना. 

हिरोगिरीचा माजही उतरू लागला हळूहळू, ते वातावरण पाहून,

अडकून पडलो बुवा आज, असे वाटून हिरमुसला म्हणे बिचारा.

दुकानाच्या आडोश्याला उभा राहून कंटाळला होता, नाईलाजाने.

तेव्हा कुणा मुलीने त्याच्या नावाने मारलेली हाक पडली कानावर, 

आपल्या शेजारची तरुण मुलगी आपणाला खुणावताना पाहून हबकलाच हा, तसा थोडा ओशाळलाही, आपणाकडे छत्री नसल्याचे तिला समजले म्हणून. ‘तुला यायचय का घरी? तिने प्रश्न केल्यावर हा चमकलाच. 

तिची ती छोटीशी“लेडीज” छत्री, त्यातून दोघे जायचे म्हणजे!

क्षणभर याला परत वाटू लागले, आपण हिरो असल्याचे,

असुयाच वाटेल माझ्या मित्रांना, आम्हा दोघांना एकाच छत्रीत पाहून,

असा एक विचार मनात येऊन उकळ्याही  फुटल्या मनात. 

छत्री न आणण्याचा असा ही लाभ होऊ शकतो, असे वाटलेच नव्हते त्याला.  याने काही बोलण्या आधी तिनेच विचारले परत, “ येतोस ना माझ्या बरोबर”? मित्र म्हणाला, “मी धीर केला मोठा आणि म्हणालो,हो, चला जावूया” हा तिच्या छत्रीत घुसणार एवढ्यात तिने आपल्या बॅगमध्ये हात टाकला; आणि नवी कोरी छत्री काढून याच्या समोर धरली.

“आजच घेतली आहे, उद्घाटन होऊ दे, तुझ्या हातून” 

मित्र म्हणाला, आम्ही गप्पा गोष्टी करीत आलो घरी, मोकळेपणाने,

पण मी खजील झालो त्या दिवशी, चिडलोही माझ्यावरच, मनातल्या मनात. ती भाबडी  शेजारीण  शेजारधर्माला जागून मदत करायला तयार झालेली;  आणि मी मात्र मनात भलतेच इमले बांधून मोकळा झालो होतो. 

त्या दिवसापासून आजपर्यंत पावसाळ्यात कधीच छत्रीविना नाही फिरलो मी.