ब्लॅक अँड व्हाईट

आयुष्याच्या संध्याकाळी चितारलेल्या रांगोळीचे रंग जरी तेच असले तरी त्यांची भाषा आगळी-वेगळी असते...पहाटेच्या लालबुंद रंगाचा नि मावळणाऱ्या दिवसाच्या लालसर रंगाचा साज एकच असला तरी त्यांचा बाज निराळा असतो...

Story: ललित । गौरी भालचंद्र |
17th July 2021, 06:04 Hrs
ब्लॅक अँड व्हाईट

विचार करून पाहताच चटकन लक्षात येतो फरक... आभाळाच्या निळाईचा नि सागराच्या निळाईचा रंग एकच असला अन् दोन्ही रंगाकडचा धावा जरी श्वास कोंडणारा असला तरी एक रंग गहिऱ्या खोलीत मिटणारा आहे तर दुसरा पंखाना क्षितीज बनवून बाह्या उंचावणारा आहे...

क्षणाक्षणाला बदलणाऱ्या परिस्थितीनुसार रंगानीही त्यांचा स्वभावधर्म बदलून आपल्याला रिझवीत राहावे हा माणसाचा हट्ट अनाठायी आहे. भर वैशाखात भुलविणारा हाफूस आंब्याचा धमकदार पिवळा रंग अवचित पडणाऱ्या थोड्याश्या पावसातदेखील आपलं मन खट्टू करणारा होऊन जातो. काळ्या रंगावर बराचसा दुजाभाव करणारे बरेचसे हटकून आपल्या केसांना काळे करीत असतात तसेच गोऱ्या–गोमट्या सुंदर बाळाच्या गालावर काळ्या काजळाचं तीट लावत असतो मोठ्या कौतुकाने. हिरव्या रंगाला काही कारणाने नाव ठेवताना समृद्धीचा रंग म्हणून नववधूला हिरवा चुडा भरीत असतो. बालपण, तरुणाई आणि प्रौढपणाचे रंगही असेच वेगवेगळे असतात. जसं स्वप्नांचं तसं त्यातल्या रंगाचं. काही ब्लॅक अँड व्हाईट असतात, काहीकाही कुठल्याच रंगाची नसतात, काही तर इतक्या रंगात रंगलेली असतात की आपल्याला त्यातला आपला नेमका रंग शोधावयास जड जाते. सगळेच रंग ईश्वराचे, सारखेच लाडके असतात. काळ्या रंगाचे मणी ओवून मंगल विवाहात गळ्यात मंगळसूत्र घालतो.  पांढरा रंग शुभ विचारांचा. आपल्या अंगावर चढवून समारंभाची शोभा वाढवितो. हिरव्या रंगाचा चुडा आपलं सौभाग्यलेणं असतं. आता भगवा रंग आपल्या शिवराईच्या पराक्रमाचा जिता जागता संदेश देणारा तर गुलाबी रंग प्रणयाचा, लाल रंग ऐश्वर्याचा, पिवळा रंग समाधानाचा, निळा रंग अमर्याद आभाळाच्या विशालतेचा, जांभळा रंग रसिकतेचा असे काही ना काही रंगांचे रंग माणसं आयुष्यभर उलगडू पहातात.

प्रत्येक माणसाचा त्याचा खास आवडीचा, खास निवडीचा रंग असतो. माणसाच्या कधी काळी रंगाशी नातं जुळलेल्या खास घटका असतात. परमेश्वरानं सर्वांना कमी अधिक सुख नि दु:खं दिलीत. आपलं काय होतं की गणित कच्चं असल्यामुळे नेहमी समोरच्याचे सुख नि स्वत:ची दु:खं मोजताना मोठा गुणक वापरला जातो. नि याच्या उलट समोरच्याचे दु:ख नि आपली सुखं मोजदाद करताना नेहमी दशांश चिन्हांची गफलत होते. स्वत:च्या जखमांनी स्वत:च्या डोळ्यात पाणी येणं ही झाली प्रकृती. पण दुसऱ्याच्या जखमांनी स्वत:च्या डोळ्यात पाणी येणं ही खरी संस्कृती. माणसं जरी काळी-गोरी, गरीब-श्रीमंत असली तरी सगळ्यांच्याच डोळ्यातले पाणी खारटच असते.

आता नुसते रंग जमूनही आपल्याला चालत नाही. त्याच्या गडद, माध्यम, फिक्या छटाही आपल्याला जमलेल्या हव्या असतात आणि त्याही पुढे या साऱ्या रंगानी आपला नूर पदोपदी सावरण्यासाठी सज्ज असावं नि आपल्या लहरीनुसार त्या रंगानी आपापल्या जागाही बदलाव्या असा आपला हट्ट असतो. नि त्या जागा बदलताना त्यांनी स्वभावधर्मही बदलावेत अशी आपली अट राहते. मग आपला त्या रंगावर रुसण्याचा खेळ सुरु होतो. आपलं आयुष्य रंगतदार असावं असं वाटत असतं. तशी रंगांची मोहिनी माणसावर असल्याचे दाखले इतिहास -पुराणात आढळतात. निसर्गात रंगांची उधळण मुक्तहस्ते चितारलेली आपण पहातो, अनुभवतो. ती या तमाम प्राणीमात्रांसाठी खुली आहे. त्या सगळ्या रंगांना प्रत्येकजण आपल्या नावाचा रंग देऊ शकतो. त्या रंगांच्या दुनियेत सर्वांचे दिलखुलास स्वागत होत असते. मूळच्या लाल,निळा,पिवळा या तीन रंगांची दुनिया एकमेकांचे  हात हातात घेतल्यामुळे कशी नि किती हजारो रंगांची निर्मिती करून गेल्याचे अदभूत आश्चर्य आपण पहात आलो आहे. सगळे रंग ओ ग्रूपच्या रक्ताप्रमाणेच जीवन देणारे  असतात.  पण त्या मागचा सरळ, सोपा आणि साधा संदेश आपल्याला कधीच कळला नाही.

आपण आपले आयुष्य आपल्या लहरीनुसार आपल्या आवडीच्या रंगात आणि त्यांच्या कमी अधिक प्रमाणातील मिश्रणात रंगवायचे कधी सोडत नाही.आणि त्यातही अतिरेक म्हणजे आपल्या सोबत्यांनीही माझ्याच आवडीचे रंग वापरावेत असाही आपला फतवा असतो. सृष्टीच्या नियमानुसार इथं प्रत्येकाला प्रत्येकाचं देणं आज ना उद्या फेडावेच लागते...नि या देवाणघेवाणीतच जगण्याचे मर्म गवसतं ...नि हे मर्म जाणण्यासाठीच नाही का माणसांची आयुष्यभराची धडपड चालू असते. तेव्हा आयुष्यात सामोरे येणाऱ्या सगळ्या रंगाना त्यांच्या आहे त्या स्वरुपात दोन्ही हात उंचावून बाहुपाशात घ्यावं...नि तो प्रत्येक क्षण साजरा करावा...हे साजरा करणं प्रत्येकानं शिकून घ्यायला हवं...कारण सोहळ्यातील नुसती उपस्थिती नि तो साजरा करणं यातलं अंतर आपल्या प्रत्येकाला ठावूक असते.. आयुष्यभराची पायपीट ...डोळ्याला झापड लावून केलेली ...ही घाण्याच्या बैलाप्रमाणे चालणे असते...गळ्यातील घुंगरू वाजत असताना आपला समज झालेला असतो की रस्ता मागे पडतो आहे.. पण  एक मनापासून चेहऱ्यावर उमटलेलं हसू एवढं उचललेलं पाहिलं पाऊलही पैलतीरावर तुम्हाला पोहोचण्यासाठी  पुरेसं असतं..

कुणाला असे रंग कितीही मनापासून आवडत असले ...तरी ब्लॅक अँड व्हाईट चित्रात असणारा ऊन – सावल्यांचा अनोखा खजिना त्या रंगाच्या दुनियेत मुळीच गवसत नाही... क्षणाक्षणाला रंग बदलणारे आयुष्य प्रत्येकाचे असते...प्रत्येक रंगाचा डौल..दिमाख ...नि छाप आगळी-वेगळी असते ..तशी  निसर्गातल्या सगळ्या रंगाची दुनिया सच्ची असते..