Goan Varta News Ad

पंचायत उभारणार स्वत:चा कचरा व्यवस्थापन प्रकल्प

ठाणे-डोंगुर्लीच्या सरपंच प्रजिता गावस यांची माहिती : सदस्यांचे सहकार्य

|
22nd June 2021, 11:51 Hrs
पंचायत उभारणार स्वत:चा कचरा व्यवस्थापन प्रकल्प

प्रजिता गावस

उदय सावंत
गोवन वार्ता
वाळपई : सत्तरी तालुक्यातील ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्राचा गेल्या दहा वर्षांपासून रखडणारा कचरा प्रकल्प आता मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. कारण आवश्यक स्तरावर सर्व संबंधित खात्याचे ना हरकत दाखले प्राप्त झालेले आहेत. यामुळे ठाणे पंचायत स्वतःचा कचरा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया लवकरच करणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टप्पा असून सर्व पंच सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळे ही मोठी समस्या हल झाल्याचे पंचायतीच्या सरपंच प्रजिता गावस यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले. दरम्यान, आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत ही महत्त्वाची समस्या सोडविली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कचरा समस्या सोडविण्यासाठी काेणत्या अडचणी आल्या?
हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. खास करून नगर व नियोजन खात्याचा ना हरकत दाखला, वनखात्याचा ना हरकत दाखला व प्रदूषण महामंडळाचा ना हरकत दाखला प्राप्त करण्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या. यासाठी पंचायतीच्या सर्व पंचायत सभासदांनी विविध स्तरावर केलेल्या कार्यामुळे शेवटी ना हरकत दाखला प्राप्त झाला. यापुढे जमीन पंचायतीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्यानंतर या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
पंचायत संचालनालयाकडून आर्थिक पाठबळ लाभले का ?
होय निश्चितच. राज्य सरकारच्या पंचायत संचालनालयाच्या सहकार्यामुळेच गेल्या दोन वर्षात जवळपास २ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो. पंचायत क्षेत्रातील विविध गावांमध्ये गटार व्यवस्थापन राबविणे, पदपथाची दुरुस्ती व नव्याने बांधकाम करणे, संरक्षक भिंतींची उभारणी करणे, त्याचप्रमाणे सार्वजनिक गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यावर भर दिला. ग्रामीण भागामध्ये या समस्या महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या समस्यांचे निवारण केल्यामुळेच लोक समाधान व्यक्त करीत असून अशा कामाला जास्त प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे ठाणे येथे निवारा शेड उभारणे व रंगमंचाची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आल्याचेही सरपंच गावस यांनी सांगितले.
रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले का ?
येणाऱ्या काळात गावाच्या कक्षा रुंदावत जाणार आहेत. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन गावातील रस्ते रुंदीकरण करण्याची प्रक्रिया पंचायतीने आतापासूनच सुरू केलेली आहे. खास करून ठाणे भागातून हिवरे, गोळवली, चरावणे येथील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी संबंधित खात्याकडे पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मंजुरी प्राप्त होणार असून यामुळे संबंधित गावातील रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सरपंच गावस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वाळपई-ठाणे मार्गावरील नानेली गावात जाणाऱ्या नवीन रस्त्याचे बांधकाम करण्याचा प्रस्तावही सरकारलाच सादर करण्यात आलेला आहे. कारण नानेली गावाचा समावेश ठाणे पंचायत क्षेत्रात करण्यात आलेला आहे. यामुळे सदर गावात विविध सुविधा निर्माण करून देणे ही पंचायतीची जबाबदारी आहे. चरावणे येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. सुमारे २७ लाख रुपये खर्चून सातेरी मंदिर ते सुभाष गावस यांच्या घरापर्यंत नवीन रस्त्याला मंजुरी प्राप्त झाली आहे.
ठाणे क्षेत्रातील मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी काय केले?
ठाणे पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज आहे. यात खास करून ठाणे हरिजनवाडा याठिकाणी या समाजाचा अंतर्भाव आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी पंचायतीने विकासकामे हाती घेतली आहेत. पंच सभासद नीलेश परवार यांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नाच्या माध्यमातून हरिजनवाडा येथे स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर झालेली आहे. आगामी काळात या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सरपंच प्रजिता गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुर्ला गावाच्या विकासासाठी काय प्रयत्न केले ?
सुर्ला गाव गोवा-कर्नाटक दरम्यानच्या गोवा हद्दीत येत असला तरीही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांच्या प्रयत्नातून येथे अनेक सुविधा निर्माण झालेल्या आहेत. तरीही पंचायत स्तरावर विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. अलीकडे या गावामध्ये निर्माण झालेली नेटवर्कची समस्या सोडविण्यास आम्ही यशस्वी ठरलो. कारण येथे जिओ नेटवर्कचा टॉवर उभारण्यात आला आहे. सदर टाॅवर अद्याप सुरू केलेला नाही. मात्र तो उभारण्यासाठी पंचायतीने महत्त्वाचे योगदान दिले.
पंचायत मंडळाचे सहकार्य कसे लाभते?
गेल्या चार वर्षांत पंचायतीच्या सर्व सभासदांचे चांगले सहकार्य लाभले आहे. सर्वप्रथम या पंचायतीची सरपंच पदाची जबाबदारी सरिता गावकर यांच्याकडे होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली या पदावर नियुक्ती झाली. मात्र, या पदावर कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्व पंच सभासदांनी चांगले सहकार्य केल्यामुळे पंचायत क्षेत्राचा विकास होण्यासाठी मदत झाली. त्याचप्रमाणे पंचायतीचे सचिव सर्वेश गावकर, क्लार्क उत्तम गावकर, सहकारी प्रदीप गावकर यांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचा दावा गावस यांनी केला.

येणाऱ्या भविष्याचा वेध घेता कचरा व्यवस्थापन प्रकल्प अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्र मोठे आहे. यामध्ये एकूण सात गावांचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढणारा कचरा त्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून यावर विल्हेवाट प्रक्रिया हाती घेण्यात येणार अाहे. _ प्रजिता गावस, सरपंच, ठाणे-डोंगुर्ली