हल्ल्यामागे आमदार डायस यांचाच हात

फर्नांडिस यांचा आरोप : डोंगर कापणीला विरोध केल्यानेच मारहाण


22nd June 2021, 10:16 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : पारोडा गावातील डोंगरावरील बेकायदेशीर डोंगर कापणी विरोधात तक्रार केल्याने आमदार क्लाफासियो डायस यांच्याकडूनच आपल्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप गॅब्रियल फर्नांडिस यांनी केला आहे तसेच हल्ला करणाऱ्या व्यक्ती या आमदार डायस यांचे कामगार असल्याचा दावाही गॅब्रियल यांनी केला.
पारोडा गावातील डोंगरावरील बेकायदेशीर कामांची पाहणी करण्यास गेलेल्या पथकासोबतच्या व्यक्तींनी घरांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर पत्रकार परिषद घेत गॅब्रियल फर्नांडिस, जुवांव कार्व्हालो, जॉन रिबेलो यांनी आमदार क्लाफासियो डायस यांचाच हल्ल्यात हात असल्याचा दावा केला आहे. याआधी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांची भेट घेत या प्रकरणी लक्ष वेधून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी गॅब्रियल फर्नांडिस यांनी सांगितले की, पारोडा येथील डोंगरावरील अवैध कापणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक पाहणीसाठी पारोळा येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत आपणही गेलेलो होतो. आमची तक्रार डोंगरावरील अवैध घरांबाबत नव्हती तर अवैध डोंगर कापणीबाबत होती. तसेच पाहणीवेळी घरांचे फोटो काढण्याचे काही कारणच नव्हते. मात्र, त्यानंतरही आमदार क्लाफासियो डायस यांनी पाठविलेल्या व्यक्तींकडून आम्हास मारहाण करण्यात आली, असे गॅब्रियल यांनी सांगितले. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांची भेट घेत या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणीही गॅब्रियल फर्नांडिस यांनी यावेळी केली.