Goan Varta News Ad

सांजाव... सां जुवांव घुंवता मुरे...

नव्या सरींसारखी आणि नव्या पल्लवींसारखी नवसृजनमय आपल्याही विचारांची ‘पराब’ करण्याचे दिवस रुजून येवोत. जुवांवाच्या पवित्र संदेशाच्या दिशेने जाण्याचे कार्य सांजावाच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांकडून घडो...

Story: लोकसंस्कृती | गोपिनाथ विष्णू गांवस |
21st June 2021, 06:50 Hrs
सांजाव... सां जुवांव घुंवता मुरे...

जून २४ हा ‘सांजाव’ चा दिवस. ख्रिश्चन समाजाचा आनंदोत्सव. सेंट जॉन बाप्तीस्तच्या जन्माचा उत्सव. ‘मावाड्याचें फेस्त’ म्हणूनही प्रसिद्ध. सांत म्हणजेच सेंट. सांत इलिजाबेत गरोदर होती त्यावेळी तिची मावशी म्हणजेच ‘येशू ख्रिस्ताची’ माता मारिया, मेरी, सायबीण तिच्या घरी आलेली. त्यावेळी तिच्याही गर्भात अर्भक वाढत होते ते अर्भक म्हणजे येशू ख्रिस्त. सायबिणीच्या गर्भातील अर्भकाने आनंदाने त्यावेळी ढुशी मारली. ख्रिश्चन समाजाच्या म्हणण्याप्रमाणे ‘उर्बे उमेदीन उडकी मारली’ ती गर्भातील जेजूची उडी, आपल्याच गर्भातल्या अर्भकाला जेजूने भेटण्याची इच्छा व्यक्त केली असे इलिजाबेतला वाटले. जुवांवाचा जन्म हा पवित्र आत्म्याचा जन्म. दोघांच्याही गर्भातील अर्भकाला एकमेकाला भेटण्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणूनच ‘सांजाव’ उत्सव साजरा करतात. या उत्सवानिमित्त सांजावाची खास गीते घरोघरी गातात. 

सांजाव... सां जुवांव घुंवता मुरे, वाट आमकां दिसोना
आयचो दीस उर्बेचो, कोण कोणाक हासोना...
चल रे, पीये रे, तुंय इल्लो घेरे, फाल्यां कायं मेवोना
असलीं फेस्तां वर्साक कित्याक, दोन फावटी येना... 

ख्रिश्चन समाजातील बांधव चर्च अथवा कॉपेलमध्ये प्रार्थना म्हणजेच ‘रोजार’ केल्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘सांजाव’ उत्सव सुरू होतो. ही प्रार्थना म्हणजे माणुसकीचा संदेश देणाऱ्या ईश्वराला घातलेले हे गाऱ्हाणेच. ही प्रार्थना ‘रोजार’ ऐकताना अविचारी माणसाच्या मनातसुद्धा सुविचार रुजू लागतील. वाईट विचारांचा निचरा होऊन जाईल. अशीच ती प्रार्थना असते असे साखळी-वजरीच्या माता भगिनी रोजी फॅर्नांडिस, गाळेल डिसिल्वा, सिंथीया फॅर्नांडिस, भिरोंडा सत्तरीचे इस्तेंव आंद्राद यांनी सांगितले. 

आमच्या बापा सर्गीच्या, तुजें नाव पवित्र जांव.
तुजें राज आमकां येंव.
तुजी खुशी सर्गार जाता, तशीच संसारांत जांव.                                                          आमचो दिसपट्टो एक गिरास, आयज आमकां दी.                                                      आनी आमी आमचेर, चुकलेल्यांक भोक्शीतां तशीच,
आमची पातकां भोगस... असे म्हणत विश्वकल्याणासाठी ही प्रार्थना असते. 

चर्चमध्ये फादरचे प्रवचन वा वाचपां होतात. ही प्रवचने सां जुवांव यांनी समाजाला दिलेल्या पवित्र संदेशावर व त्यांच्या कुटुंबावर असतात. या दिवशी तीन प्रकारचे वाचन होते. एक वाचन फादर करतात व दोन वाचपां चर्चमधल्या उपस्थितांपैकी कुणीही करतो. ‘मास’ झाले की सगळेजण आपापल्या क़ॉपेलजवळ प्रार्थना करतात.  

या दिवशी सगळ्यांच्या घरात ‘सान्नां’ चे अनेक प्रकार केले जातात. काहींजण मांसाहारी जेवणही करतात. या दिवशी सगळेच नवीन जावई आपल्या सासरला ‘ मावाड्याला ’ येतात. वधुच्या घरची मंडळी जावयाच्या घरी फळांचे ‘वझे’ पाठवतात. त्याला ‘दाली’ म्हणतात. त्यात अननस, आंबा, केळी, फणस व इतर फळे देण्याची प्रथा आहे. या दालीत वधुच्या घरची मंडळी दोन कॉपेल पाठवतात. ‘कॉपेल’ म्हणजे सांजावाच्या वेलीने आणि फुलांनी माथ्यावर बांधण्यात येणारे गोलाकार चक्र. तसेच ज्यांनी नवीन घर बांधले आहे. ज्यांच्या घऱात लग्नकार्य झाले आहे. ही मंडळी सांजावाला दाली देतात. सांजावाच्या दिवशी वाड्यावरील सगळेजण घराघरात जातात व त्यांना फळे देण्याची पवित्र परंपरा आहे.     

वधूच्या घरची जावयाच्या माथ्याला कॉपेल व तेल घालून त्याला स्नान घालतात. कॉपेल घातले की जावयाने पैसे देण्याचीही परंपरा आहे. काही ठिकाणी दालीबरोबर आलेल्या दारूच्या बाटल्यांची ‘पावणी’ व्हायची आणि त्या पैशातून कॉपेलजवळ लादाईन, लादेन, तेर्स म्हणजेच एक प्रकारची पूजा केली जायची. त्यादिवशी कॉपेलजवळ हयात असलेल्या आणि नसलेल्यांसाठीही विशेष प्रार्थना करण्याची परंपरा आहे. सांजावात सहभागी होणारे सगळेच जण आपल्या माथ्याला कॉपेल बांधतात. हे कॉपेल पटकळीण, गुलाब, कलवंत, अनंत, करंड, जास्वंद, मोगरी व इतर फुलांनी सजवलेले असते. कॉपेल बांधून सगळेजण कोसळणाऱ्या पावसात घुमटाच्या तालावर मांडे व इतर लोकगीते म्हणत आनंदाने नाचतात. त्यामध्ये... 

तांबडे रोजा, तुजे पोले, दुःखानी भल्ल्यात मोजे दोळे.... व
जांवूय आमी फेस्ताक आयला
म्हूण वाड्यार बोवाळ पडला...

ही गीते म्हणतच सगळेजण वाड्यावरच्या विहिरीवर जमा होतात. जुवांवाने गर्भात घेतलेल्या उडीचे प्रतीक म्हणूनच सगळेजण महिला व पुरुष ‘व्ही वा सांजाव…’ म्हणत विहिरीत उडी घेतात. त्यात सुंय मारणे उडी, मुडी उडी, मांडी उडी, तिरपी उडी, पाठ उडी मारतात. मारताना ‘सुंय मुडी’ असे म्हणत उडी मारतात. या उडी मारल्यानंतर उसळणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यानेच जमलेले सगळे भिजून जातात. विहिरीत, नदीत आणि आता तर समुद्रातही सांजाव साजरा करण्याची परंपरा रुजली जात आहे. त्यावेळी विहिरीवर आणलेली दालीतल्या फळांचा सगळेजण आस्वाद घेतात.  

“ बरें करात आनी वायट सोडात ” हा जुवांवाचा पवित्र संदेश प्रत्येकाने जपण्याचा मंत्र आजही चर्चमधील फादर गोव्यातील ख्रिश्चन समाजाला देत आहेत. या महिन्यात ख्रिश्चन समाज जुवांवाच्या जन्माचा उत्सव साजरा करतात तर हिंदू समाज निसर्गाच्या जन्माचा उत्सव म्हणजेच नव्या सरींचा व नवीन पल्लवींची ‘पराब’ करतात. बरे करण्याची, वाईट सोडण्याची, नव्या सरींसारखी आणि नव्या पल्लवींसारखी आपल्याही विचारांची ‘पराब’ करण्याचे दिवस रुजून येवोत. जुवांवाच्या पवित्र संदेशाच्या दिशेने जाण्याचे कार्य सांजावाच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांकडून घडो. व्ही वा, सांजाव...