सीआरझेड उल्लंघनामुळे किनारे असुरक्षित

मांद्रे मतदारसंघातील प्रकार; पडझड रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th June 2021, 12:18 am
सीआरझेड उल्लंघनामुळे किनारे असुरक्षित

समुद्राच्या लाटेत वाळू वाहून गेल्याने मुळापासून खिळखिळे झालेले सुरुचे झाड आगामी संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देत आहे. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : केंद्र सरकारने समुद्र आणि नद्यांचे किनारे सुरक्षित रहावेत, यासाठी ‘किनारी क्षेत्र नियामक विभाग’ कायदा १९९१ साली केला. मात्र, या कायद्याचा भंग केला जात असल्यामुळे मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे मांद्रे, हरमल व केरी तेरेखोल किनारे असुरक्षित बनले आहेत. हे किनारे खचू लागले आहेत. इतकेच नाही तर सुमारे १७ कोटी रुपये खर्चून केरी किनारी बांधलेली सुरक्षा भिंतही खचत चालली आहे. आतापर्यंत ही भिंत दोन वेळा कोसळली आहे. ही पडझड थांबवून किनारे वाचवणे काळाची गरज आहे.
मांद्रे मतदारसंघातील समुद्र किनारे व त्या-त्या परिसरातील किनाऱ्यांचे भाग खचत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याचा स्थानिक व्यावसायिक व लोकवस्तीला भविष्यात मोठा धोका संभवतो. मोरजी, आश्वे मांद्रे, हरमल व केरी तेरेखोल या चार पंचायत क्षेत्रांतील समुद्राचे पर्यटकांना आकर्षण आहे. त्या किनाऱ्याच्या प्रेमात देशी-विदेशी पर्यटक पडतात. आता हेच समुद्रकिनारे ढासळू व खचू लागले आहेत.या मतदारसंघातील सर्व किनारी भागात मोठ्या प्रमाणात वाळूची टेंबे होती. ते भरतीच्यावेळी समुद्राच्या पाण्याला किनाऱ्यावर रोखून धरायची व होणारी झीज थांबवायची. पण पर्यटन क्षेत्राच्या‌ विकासासाठी ही वाळूची टेंबे स्थानिक आणि परप्रांतीय व्यावसायिकांनी तिचे सपाटीकरण केली आहे. शॅक्स, रेस्टॉरंट, ट्री हाऊस घालण्यासाठी चक्क सीआरझेड कायद्याचा भंग करत ही टेंबे नष्ट करून किनारे पूर्ण सपाट केले आहेत. विशेष म्हणजे, या निसर्ग विध्वंसकांना प्रशासनानेही पाठिशी घातले. त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.
केरीची सुरक्षा भिंत म्हणजे पांढरा हत्ती!
केरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरुचे बन आहे. भरतीच्यावेळी पावसाळ्यात समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावर येऊन आदळायच्या. त्या लाटा सुरुच्या बनापर्यंत येऊन पोहोचायच्या. परिणामी पाण्याच्या प्रवाहाबरोबर झाडांच्या मुळातील वाळूची झीज होऊन झाडे समुद्रात जलसमाधी घ्यायचे. त्याची दाखल घेऊन प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आमदार असताना आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असताना नाबार्ड निधीतून सुरुवातीला पावणे सात कोटी रुपये खर्च करून १,६२० मीटर लांबीची केरी फेरीबोट धक्का ते आजोबा मंदिरापर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले. हे काम अजून पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत १७ कोटी रुपये या भिंतीवर खर्च करण्यात आले आहेत. आता याच भिंतीच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही माहिती आमदार दयानंद सोपटे यांनी दिली आहे.
केरी किनाऱ्यावरील सुरुची झाडे कोसळली आहेत. त्या ठिकाणी आणखी १ हजार झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल. - दयानंद सोपटे, आमदार