कोविड विभागात काम म्हणून होते बदनामी

परिचारिकांची पुन्हा असोसिएशनकडे तक्रार


10th June 2021, 10:32 pm
कोविड विभागात काम म्हणून होते बदनामी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : येथील हाऊसिंग सोसायटीमधील परिचारिकांच्या वास्तव्याला विरोध करण्याचे प्रकरण ताजे असतानाच सार्वजनिक कार्यक्रमात कोविड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना बोलावू नये, अशा आशयाचा डिचोली येथील शिक्षणतज्ज्ञ महिलेचा संदेश समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने परिचारिकांकडून पुन्हा असोसिएशनकडे तक्रार करण्यात आली आहे. असोसिएशनने या प्रकरणी शुक्रवारी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कोविड महामारीच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्यरत परिचारिका मार्च २०२० पासून अविरत काम करत आहेत. मडगाव येथील एका हाऊसिंग सोसायटीत वास्तव्यास असणाऱ्या परिचारिकांच्या मुद्द्यावरून सोसायटीने पाठवलेल्या नोटिशीनंतर संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षांनी माफीनामा देत प्रकरण मिटवले होते. आता डिचोली येथील शिक्षणतज्ज्ञ व्हिक्टोरिया डायनोसिओ यांनी कोविड विभागात काम करणाऱ्या परिचारिकांना सार्वजनिक कार्यक्रमात निमंत्रित करू नये. कार्यक्रमात सहभागी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा संदेश लिहिला होता. तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कॅज्युअल्टी विभागाच्या प्रमुख लिस्मा बर्रेटो यांनी ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया गोवा या परिचारिकांच्या असोसिएशनकडे याबाबत तक्रार केली आहे. अशाप्रकारच्या संदेशातून परिचारिकांच्या कामाचा अपमान होत असून कामाचा उत्साह कमी होऊ शकतो. संबंधित व्यक्तीने परिचारिकांची माफी मागावी, अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही लिस्मा यांनी असोसिएशनकडे केली आहे.
....
परिचारिकांची बदनामीबाबतची तक्रार आली आहे. याची गंभीर दखल असोसिएशनने घेतली आहे. कोविड काळात रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिकांचा सन्मान केला पाहिजे. मात्र, काही जणांकडून चुकीचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी डिचोली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात तक्रार नोंदविली जाईल.
_ कुंतल केरकर, अध्यक्ष, अखिल गोवा परिचारिका असोसिएशन

हेही वाचा