Goan Varta News Ad

ऑफर आल्यास भाजपच्या तिकिटावर लढू

मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून स्पष्ट

|
10th June 2021, 10:30 Hrs
ऑफर आल्यास भाजपच्या तिकिटावर लढू

फोटो : बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गोविंद गावडे. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजपने ऑफर दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक आपण भाजपच्या तिकिटावर लढू, असे मंत्री गोविंद गावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि राज्य प्रभारी सी. टी. रवी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या चार वर्षांपासून आपण भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यापासून आजपर्यंत भाजपने आपल्याला पूर्ण साथ दिली आहे. त्यामुळे तेव्हापासून आपली भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा होती. पण आपण अद्याप भाजपमध्ये रितसर प्रवेश केलेला नाही. तरीही भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात येऊन जेव्हा बैठका घेतात, त्या बैठकांत आपण सहभागी होतो. पक्षाच्या विविध वेबिनारमध्येही आपला सहभाग असतो. अजून आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यास भाजपच्या तिकिटावर आपण निवडणूक लढवू, असे मंत्री गावडे म्हणाले.
बी. एल. संतोष आणि सी. टी. रवी यांनी गुरुवारी आपल्याशी १५ मिनिटे चर्चा केली. यात आपल्याकडे असलेल्या कला व संस्कृती, नागरी पुरवठा, आदिवासी कल्याण या खात्यांचा त्यांनी आढावा घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.