माजी सभापती शेख हसन हरूण यांचे निधन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May 2021, 12:23 am
माजी सभापती शेख हसन हरूण यांचे निधन

पणजी : गोव्याचे माजी सभापती शेख हसन हरूण (८४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते.
१७ मार्च १९३७ रोजी पणजीत जन्मलेले हरूण यांनी बीएएलएलबीचे शिक्षण घेऊन प्रथितयश वकील म्हणून नाव कमावले. काँग्रेस नेते म्हणून परिचित असलेले हरूण १९७७ साली पहिल्यांदा मुरगाव मतदारसंघातून आमदार झाले. तेव्हापासून पाच वेळा त्यांनी मुरगावचे प्रतिनिधित्व केले. १९८० ते १९८४ या काळात ते कायदा आणि महसूलमंत्री होते. १९८५ ते १९८९ या काळातही कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९१ ते १९९५ या काळात त्यांनी सभापती म्हणून आपल्या कार्याची छाप उमटवली. १९९९ ते २००२ या काळात ते उद्योगमंत्री होते.
काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या हरूण यांनी विधानभेत स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली होती. नंतरच्या काळात काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाल्यानं त्यांनी ‘शेख हसन इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा पक्ष काढला. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये हा पक्ष विलिन केला. गोव्याच्या विधानसभेत पोहोचलेला मुस्लीम समाजाचा एकमेव नेता म्हणून हरूण ओळखले जातात. त्यांच्या आधी किंवा नंतर आतापर्यंत मुस्लीम समाजाचा एकही आमदार झाला नाही.