सांताक्रूझ फुटबाॅल मैदानावरील टर्फ चीनचे असणार नाही

क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक प्रभुदेसाई यांचे स्पष्टीकरण


05th May 2021, 11:37 pm

पेडणे : सांताक्रुझ फुटबाॅल मैदानावर घालण्यात येणारे कृत्रिम टर्फ चिनी कंपनीकडून आणण्यात येणार नाही. केवळ अमेरिका, युरोप व आॅस्ट्रेलियात तयार करण्यात येणारे टर्फच स्वीकृतीसाठी वैध ठरवण्यात येत अाहे. त्यामुळे चिनी कंपनीकडून टर्फ घेऊ शकत नाही, असे क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
या मैदानावरच्या टर्फसंबंधी प्रसिद्धीमाध्यमात काही शंका उपस्थित झाल्या आहेत. तथापि, टर्फ बसवण्याची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे, असे प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. या मैदानावर टर्फ घालण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांसाठी अर्ज आले असून निविदांची कडक पद्धतीने छाननी सुरू आहे.
दरम्यान, प्रथम मातीचे परीक्षण करण्यात येणार असून त्यानंतर टर्फ बसवण्यात येणार आहे. फिफाची मान्यता असलेल्या एजन्सीकडून या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. टर्फ बसवल्यानंतर हे मैदान भारतीय फुटबाॅल महासंघ (एआयएफफ), जीएफए, क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवा व्यवहार खाते, गोवा विद्यापीठ, ग्रामपंचायती, शिक्षण संस्था, जीएफएशी संलग्न व असंलग्न क्लब यांनी आयोजित केलेले फुटबाॅल सामन्यांचे आयोजन करण्यास पात्र ठरेल, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
फिफाती उच्च मान्यता (प्रीफर्ड) असलेल्या कंपन्यांनी जर्मनी, कॅनडा व नेदरलँड येथे तयार करण्यात आलेल्या टर्फसाठी निविदा सादर केल्या आहेत. फिफा प्रीफर्ड ब्रँडएेवजी लायसन्स ब्रँडसाठी अर्ज केल्याने इंग्लंडमधील एक बोलीदार अपात्र ठरला आहे, अशी माहिती प्रभुदेसाई यांनी दिली.
सांताक्रुझ फुटबाॅल मैदानावर घालण्यात येणारे टर्फ जागतिक दर्जाचे असेल व निविदा प्रक्रिया करताना आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येणार आहे. टर्फ घालण्याची संपूर्ण प्रक्रिया फुटबाॅल संघटनांची जागतिक शिखर संस्था असलेल्या फिफाच्या निगराणीखाली होणार आहे. _ व्ही. एम.प्रभुदेसाई, कार्यकारी संचालक, क्रीडा प्राधिकरण