Goan Varta News Ad

पाच पालिका, पंचायत पोटनिवडणुकांसाठी आज मतदान

४०९ उमेदवार रिंगणात; सोमवारी मतमोजणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April 2021, 12:32 Hrs
पाच पालिका, पंचायत पोटनिवडणुकांसाठी आज मतदान

पणजी : म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांच्या निवडणुका तसेच कारापूर-सर्वण पंचायतीच्या प्रभाग दोन व वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग चारमधील पोटनिवडणुकांसाठी शुक्रवारी करोनाच्या सावटाखाली मतदान होणार आहे. पाच पालिकांसाठी १,८५,२२५, तर पंचायत पोटनिवडणुकांसाठी ९९९ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. तर पालिकांसाठी ४०२ आणि पोटनिवडणुकांसाठी ७ उमेदवारांत टक्कर होणार आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. करोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी सोमवारी होणार आहे.
राज्यात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या निवडणुकांतून करोनाचा अधिक फैलाव होऊ नये, यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुका व पोटनिवडणुका होत असलेल्या पालिका तसेच पंचायत क्षेत्रांत कडक निर्बंध लागू केले आहेत. पालिका तसेच पंचायत क्षेत्रात शुक्रवारी आणि सोमवारी जमावबंदी आदेशाचे कडक पालन करण्यात येणार आहे. दरम्यान, म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांतील आरक्षण तसेच प्रभाग फेररचनेचा वाद प्रथम उच्च आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने नव्याने आरक्षण जारी करून ३० एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी पाचही पालिकांत मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही दिवसांत समर्थन दिलेल्या पॅनेल्सचा जोमाने प्रचार केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सर्वच ठिकाणच्या मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरातील रेस्टॉरन्ट, बार, चहा-पानाची दुकाने तसेच इतर खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत, तसेच सोमवारी मतमोजणी दिवशी केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरील अशी दुकाने सकाळी ६ ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवावी लागणार आहेत. तसेच मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यासही बंदी असणार आहे.

मुरगावात पैशांचे वाटपकरताना पकडले!
वास्को : मुरगाव पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आठमध्ये मतदारांना पैशांचे वाटप करणाऱ्या दोन युवकांना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व यांच्या कार्यकर्त्यांनी कडून भरारी पथकाच्या स्वाधीन केले. इर्शाद आणि सागर अशी या युवकांची नावे असून त्यांच्याजवळ दीड लाखाची रोकड सापडल्याचा दावा आमोणकर यांनी केला आहे.
दोन युवक गुरुवारी दुपारच्या सुमारास प्रभाग आठमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली होती. आम्ही तेथे धाव घेतली असता, ते युवक धावत समोरील घरात शिरले. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना घराबाहेर आणले आणि त्यांची झडती घेतली, असे आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले. त्या युवकांजवळ नावे लिहिलेली पैशांची ५० पाकिटे होती. त्या पाकिटांमध्ये ५ हजार ते १० हजार रुपये होते. या घटनेची माहिती भरारी पथक व पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. नंतर युवकांना त्यांच्या स्वाधीन करून पैशांची पाकिटेही दिली, असेही ते म्हणाले.