Goan Varta News Ad

‘आप’ ला पर्रीकरांचा आधार?

खुद्द अरविंद केजरीवाल यांची चेष्टा करणारे आणि त्यांच्यावर खटले भरण्यासाठी प्रयत्न करणारे पर्रीकर यांच्याविषयी आम आदमी पक्षाला एवढा पुळका कसा असा प्रश्न पडतो.

Story: अग्रलेख |
14th April 2021, 01:01 Hrs
‘आप’ ला पर्रीकरांचा आधार?

काँग्रेसमय झालेली जनता आपल्याला स्वीकारत नाही असे कितीतरी वर्षे दिसून आल्यानंतर भाजप सारख्या आजच्या बलाढ्य पक्षाने २०१४ पासून काँग्रेसच्याच नेत्यांचे पुतळे बांधणे, त्यांच्या नावाने मोहीमा राबवणे असे प्रकार सुरू केलेले दिसत आहेत. सरदार पटेल, महात्मा गांधी यांना भाजपचे कार्यकर्ते मनातून अपशब्द वापरत असतील पण केंद्रात तर यांच्याच नावाचे नाणे चालते. भाजपने त्या त्या राज्यांमध्ये प्रादेशिक नेत्यांचा शोध घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शपथा घेण्याचे सत्रच चालवले आहे. सध्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत अशा राज्यांमध्ये असे राजकारण होत आहे. भाजपचा हा फॉर्म्युला आता आम आदमी पार्टी वापरण्याच्या तयारीत आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपला जे उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे, तेच धडे आम आदमी सारखा पक्ष आता गिरवण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणता येईल. गोव्यात भाऊसाहेब बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा साकारण्याचे ध्येय आता आम आदमी पक्षाने ठेवले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तसे जाहीर केले आहे. भाजपकडून पर्रीकरांच्या स्वप्नातील गोवा साकारला जाऊ शकत नाही असे त्यांना वाटते. भाजप आणि काँग्रेसने पर्रीकरांचे व्हिजन संपवले. भाजपने तर पर्रीकरांचे व्हिजन राबवू पाहत असलेल्यांनाच पक्षापासून दूर केले. पर्रीकर हे विकासाचे संस्थापक होते असे एक नव्हे अनेक दावे सिसोदिया यांनी केले आहेत. सिसोदिया यांना आपच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांनी ब्रिफिंग दिली असावी अन्यथा ते असे काही बोलले असते असे वाटत नाही. खुद्द अरविंद केजरीवाल यांची चेष्टा करणारे आणि त्यांच्यावर खटले भरण्यासाठी प्रयत्न करणारे पर्रीकर यांच्याविषयी आम आदमी पक्षाला एवढा पुळका कसा असा प्रश्न पडतो आणि आपच्या या भूमिकेचे आश्चर्यही वाटते. बरे एकदा नव्हे तर सलग दोन दिवस सिसोदिया यांनी पर्रीकरांचेच व्हिजन पुढे नेण्यासाठी आप प्रयत्न करेल असे विधान केले. त्यामुळे भाजपपासून दुरावलेल्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी आम आदमी पक्षाचा प्रयत्न चालला आहे हे जाहीर दिसत आहे, पण त्यांच्या जोरावर चाळीसही जागांवर गोव्यात आम आदमी पक्षाचे उमेदवार जिंकून येतील असे आताच स्वप्न पाहणे आम आदमी पक्षासाठी घातक ठरू शकते हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आम आदमी पक्षाची विचारसरणी, पक्षाने दिल्लीत दिलेले प्रशासन याबाबत लोकांना किंचितशी माहिती असली तरी सरसकट सगळ्याच मतदारसंघांत आपचा पर्याय लोक स्वीकारतील असे त्यांना वाटत असेल तर आप फार मोठ्या भ्रमात आहे असेच म्हणावे लागेल. शिवाय पर्रीकर यांना कधीच न मानणारा एक घटक आपजवळ आहे तोही दुखावला जाऊ शकतो याचे भान आपच्या नेत्यांना नसावे.
आपजवळ गोव्यात मोठे नेते नाहीत. जे आहेत ते प्रामाणिक आणि स्वच्छ असतील पण पर्रीकरांच्या नावाचा वापर करून काही कमवू शकतो असे त्यांनी सिसोदिया सारख्या नेत्यांना सांगितले असेल तर त्यांच्या परिपक्वतेविषयी शंकाच आहे. दिल्लीतले सुशासन, तिथे सर्वसामान्य जनतेला मोफत मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा, शिक्षण क्षेत्रात होणारी क्रांती अशा गोष्टींविषयी जर गोमंतकीयांना जास्त स्पष्टपणे सांगितले तर कदाचित त्याचा फायदाच होऊ शकतो. पण पर्रीकरांच्या नावाचा फायदा होईल असे पक्षाला वाटत असेल तर ते हास्यास्पद आहे. 
एका बाजूने भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात शिक्षणाचा पाया घातला, जो काँग्रेस आणि भाजपने कमकुवत केला असे सिसोदिया म्हणतात आणि पुढे पर्रीकरांनी घातलेला विकासाचा पाया भाजपने कमकुवत केला असे म्हणतात. मार्च २०१९ पर्यंत पर्रीकरच भाजपचे गोव्यातील सर्वेसर्वा होते. मग सिसोदिया यांना भाऊसाहेबांच्या ध्येयधारणांना कमकुवत करणारी कोणती भाजप अभिप्रेत आहे ते लोकांना कळले असते तर बरे झाले असते. तसेच २०१९ नंतर गेल्या दोन वर्षातच पर्रीकरांनी घातलेला विकासाचा कुठला पाया कमकुवत झाला तेही त्यांनी संदर्भासह सांगितले असते तर ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना ते अधिक प्रभावीपणे समजू शकले असते. मान्य आहे, आपचे पुरोगामी आणि प्रामाणिक राजकारण गोव्यात सुरू आहे, पण म्हणून भाजपच्या आणि मगोच्या दिवंगत नेत्यांच्या नावाने मते मागून ती मिळतील असा समज इतक्यात करून घेणे आपला निश्चितच परवडणारे नाही.