केंद्रीय योजनांद्वारे राज्याला मिळणार सुमारे ५ हजार कोटी

सचिवांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती


09th April 2021, 12:17 am
केंद्रीय योजनांद्वारे राज्याला मिळणार सुमारे ५ हजार कोटी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्रीय योजनांच्यापोटी राज्याला 4 हजार ते 5 हजार कोटीपर्यंत निधी मिळणे शक्य आहे. याशिवाय विविध प्रकल्पांसाठी सरकार नाबार्डकडून २५० कोटींचे कर्ज घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते गुरुवारी खात्यांच्या सचिवांसोबतच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
अर्थसंकल्पातील योजनांचा तसेच आश्वासनांच्या पूर्ततेबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात खात्यांचे सचिव आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्राच्याा विविध १२२ योजना आहेत. या योजनांसाठी ४ ते ५ हजार कोटी रुपये मिळतील. या योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. बहुतेक योजनांची कार्यवाही १९ डिसेंबरपर्यंत सुरू होईल. मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात या महिन्याच्या अखेरीस जारी होईल. ३० मेपर्यंत खाण महामंडळाची स्थापना होईल.
आतापर्यंत सरकारने नाबार्डकडून वर्षाला ४० कोटीपर्यंत कर्ज घेतले होते. अद्याप अडीच टक्के व्याजाने २५० कोटी कर्ज घ्यायचे आहे. या कर्जाद्वारे अर्थसंकल्पातील प्रकल्प पूर्ण होतील. १९ डिसेंबरपर्यंत ७० टक्के प्रकल्प पूर्ण होतील. प्रकल्पांसाठी मुदत निश्चित केली आहे. सरकाराच्यो ज्या इमारती विनावापर आहेत, तेथे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेली कार्यालये स्थलांतरित केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.