ड्रग्जप्रकरणी संशयितास कोठडी

शिवोलीतून १९.३२ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 12:17 am
ड्रग्जप्रकरणी संशयितास कोठडी

म्हापसा : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी मध्यरात्री शिवोली येथे छापा टाकून १९ लाख ३२ हजार २५० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी पथकाने महंमद फैजल (२३, वायनाड-केरळ) या संशयिताला अटक केली आहे. त्याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे.
भाटी-शिवोली येथील एका भाड्याच्या खोलीवर राहणारा व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी व सेवन प्रकरणात गुंतल्याची माहिती गुप्तहेरांनी पथकाला दिली होती. या माहितीची दखल घेऊन अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी मध्यरात्री ११.०५ ते पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास त्या भाड्याच्या खोलीवर छापा टाकला. यावेळी पथकाने महम्मद फैजल या संशयिताला ताब्यात घेऊन खोलीची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून १९ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे ५.८८२ ग्रॅम एलएसडी पेपर आणि ३.१२५ ग्रॅम एलएसडी लिक्विड जप्त केली. या प्रकरणी पथकाने संशयिताला रीतसर अटक करून त्याच्या विरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याचे कलम २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
संशयित महंमद फैजल याला पोलिस कोठडीसाठी शुक्रवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.      

हेही वाचा