कर्तृत्ववान दिग्दर्शक

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
31st January 2021, 05:37 pm
कर्तृत्ववान दिग्दर्शक

कलेला व कलाकाराला सीमा नसतात असे सांगितले जाते. त्यात एक प्रतिभावंत कलाकार मग तो कुठल्याही क्षेत्राशी निगडीत असो, जिथे जाईल तिथे आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरतो. अशाच मोजक्या कलाकारांमध्ये समावेश होतो; तो स्व. वसंत जोगळेकर यांचा. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. काही व्यक्तिमत्त्वे कर्तृत्वाने इतकी मोठी झालेली असतात की त्यांच्याविषयी लिहायचे म्हटले तर सूर्याला दीप दाखवल्यासारखे होते.

वसंत जोगळेकर यांचे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान हे उल्लेखनीय आहे. निर्माते व दिग्दर्शक म्हणून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करणाऱ्या जोगळेकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१४ रोजी यवतमाळ येथे झाला. वडील नावाजलेले वकील होते. दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूर गाठले. तेथील वास्तव्य त्यांच्या कारकिर्दीची दिशा बदलण्यास पूरक ठरले. नाट्य निर्मितीतील त्यांची रुची पाहण्याजोगी होती. त्याकाळी नाटके बसवण्यापासून ते त्यांचे दिग्दर्शन करण्यापर्यंतची जबाबदारी ते स्वखुषीने घेत. मुळात वसंत जोगळेकर एका उत्तम व आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. त्यांचे देखणेपण सर्वांनाच मोहित करत असे. त्यामुळे खरे तर त्यांनी नायकाच्या भूमिका साकारायला हव्या होत्या, मात्र त्यांची रुची दिग्दर्शनात होती.

त्यांनी ‘आंधळ्यांची शाळा’ हे नाटक बसवले होते. पदवी प्राप्त केल्यावर अभिनेता बनण्यासाठी जोगळेकर नागपूरहून मुंबईला आले. सागर मुव्हीटोनच्या ‘बदामी’ या गाजलेल्या दिग्दर्शकाशी त्यांची भेट झाली. जोगळेकर ‘बदामी’ यांचे सहाय्यक म्हणून सागर मुव्हीटोनद्वारे चित्रपटसृष्टीत दाखल झाले. ‘चिंगारी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. सागर मुव्हीटोन ही संस्था १९४०-४१ च्या दरम्यान बंद झाल्याने जोगळेकरांनी पुणे येथे मुक्काम हलवला. तेथे १९४२ मध्ये जोगळेकरांनी सदूभाऊ गद्रे यांच्या ‘किती हसाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. नंतर त्यांनी ‘चिमुकला संसार’ या मा. विनायकांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यामध्ये मा. विनायक व मीनाक्षी हे नायक-नायिकेच्या, तर सुमती गुप्ते या सहनायिकेच्या भूमिकेत होत्या. पुढे जोगळेकर व सुमती गुप्ते विवाहबद्ध झाले. त्यांना तीन मुली झाल्या. त्यांची कन्या मीरा ही ‘एक कली मुस्काई’ची नायिका होती.

पुढे जोगळेकरांना मुंबई येथे दत्तू बांदेकर लिखित ‘आपकी सेवा में’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. १९४७ मध्ये आलेल्या या चित्रपटात दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटात सर्वप्रथम पार्श्वगायन केले होते. असेही सांगितले जाते की, पुढे वसंतराव व मंगेशकर कुटुंबाची इतकी जवळीक झाली की वसंतरावांच्या कोणत्याही चित्रपटात गायल्यानंतर लतादीदींनी कधीच मानधन घेतले नाही. वसंतरावांनी अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध करत, स्वत:ची ‘पंचदीप प्रॉडक्शन’ ही चित्रपट निर्मिती संस्था सुरु केली व ‘साखरपुडा’ या चित्रपटाची निर्मिती केली. १९५१ मध्ये ‘नंदकिशोर’ या हिंदी व मराठीत बनलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यानंतर जोगळेकरांचे ‘समाज’, ‘कारागीर’, ‘शेवटचा मालुसरा’ (१९६५), ‘एक कली मुस्काई’ (१९६८), ‘आज और कल’ (१९६३), ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९७६), ‘जानकी’ (१९७९) इत्यादी अनेक हिंदी- मराठी चित्रपट गाजले.

१९५८ मध्ये वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित व निर्मिती केलेल्या ‘कारीगर’ या हिंदी चित्रपटात अशोककुमार नायक होते. जोगळेकरांच्या कामाने प्रभावित झालेल्या अशोक कुमार यांची वसंतरावांशी घनिष्ठ मैत्री झाली होती. ‘कारीगर’ नंतर पंचदीप बॅनरचा चित्रपट होता, ‘आंचल’. यात अशोककुमार व निरुपा रॉय ही तत्कालीन गाजलेली जोडी होती. संगीत सी. रामचंद्र यांचे होते, जे बरेच गाजले. पुढे या ‘आंचल’च्या कथेवरूनच ‘जानकी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. हा चित्रपट किती जणांच्या लक्षात आहे माहीत नाही, परंतु त्यातील ‘विसरू नको श्रीरामा मला..., की घुंगरू तुटले रे... झुलतो बाई रास झुला’ या गीतांचे गारुड आजही श्रोत्यांवर कायम आहे.

१९६३ मध्ये जोगळेकरांनी पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकावर आधारीत ‘आज और कल’ या चित्रपटाची निर्मिती केली. सामाजिक आशयाच्या या चित्रपटात अशोककुमार, सुनील दत्त, नंदा, तनुजा, देवेन वर्मा अशा नामांकित कलाकारांची फौज होती. संगीतकार रवी यांच्या संगीताने सजलेला हा चित्रपट तुफान गाजला. वसंत जोगळेकरांचा ‘शेवटचा मालुसरा’ हा चित्रपट तर अशोककुमार यांचा पहिला मराठी चित्रपट ठरला. अशोककुमार यांच्याशी त्यांची इतकी जिवलग मैत्री होती की, त्यांच्या कोणत्याही चित्रपटात अशोककुमार आढेवेढ न घेता उपस्थिती लावत. असे सांगितले जाते की, जोगळेकरांचे व्यक्तिमत्त्वच इतके प्रेमळ होते की, त्यांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येकजण त्यांचाच होत असे. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या घरातील कुठलाही समारंभ हा ज्या मोजक्या मित्रमंडळींशिवाय अपूर्ण ठरे, त्यात मंगेशकर कुटुंबिय व अशोक कुमार यांचा समावेश होता.

१९८० मध्ये जोगळेकर चित्रपटसृष्टीतून निवृत्त झाले. मात्र त्यांची जवळची मित्रमंडळी कायम त्यांच्या संपर्कात राहिली. उतारवयात त्यांची तब्येत ढासळत गेली व ३० जानेवारी १९९३ रोजी त्यांनी जीवनाच्या रंगमंचावरील आपली भूमिका आटोपती घेतली. अवघ्या हिंदी -मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तबगारीने, सृजनशीलतेने आणि आनंदी स्वभावाने मोहिनी घातलेल्या एका भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा अस्त झाला खरा, पण निर्माता- दिग्दर्शक म्हणून वसंतरावांनी जे अढळपद प्राप्त केले आहे ते आजही अबाधित आहे, असे म्हटल्यास त वावगे ठरणार नाही.

(लेखिका नामवंत सिनेसमीक्षक आहेत.)