दाबोळीवरून ९५ लाखांचे सोने जप्त; प्रवाशास अटक

प्रवासी पश्चिम बंगालचा; चौकशी सुरू


24th January 2021, 11:52 pm
दाबोळीवरून ९५ लाखांचे सोने जप्त; प्रवाशास अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता
वास्को : दिल्लीहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या विस्तारा एअरवेज विमानाच्या आसनाखाली एका प्रवाशाने लपवून ठेवलेले सुमारे ९५ लाख रुपयांचे सोने अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केले. हा प्रवासी पश्चिम बंगालचा असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, एप्रिल २०२० पासून आतापर्यंत गोवा अबकारी विभागाने दाबोळी विमानतळावरून सुमारे १ कोटी ११ लाख रुपयांचे २ किलो ५१५ ग्रॅम तस्करीचे सोने जप्त केले आहे.
विस्तारा एअरवेजच्या दुबईहून दिल्लीमार्गे गोव्यात येणाऱ्या विमानातील एक प्रवासी सोने तस्करी करत असल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवण्यात आली होती. विमान उतरल्यावर अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी सुरू केली. यावेळी एका आसनाखाली लपवून ठेवलेले सोने सापडले. या सोन्याचे वजन २ किलो १७० ग्रॅम इतके आहे. प्रवाशाला सर्व सोपस्कारानंतर अटक करण्यात आली.
दुबईहून दिल्लीला आलेल्या प्रवाशाने तस्करीचे सोने आणले होते. ते सोने आसनाखाली लपवले होते. दिल्ली येथे तो प्रवासी उतरला. त्यानंतर त्याचाच साथीदार दिल्लीत विमानात चढला व त्याच आसनावर बसला. देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची विमानतळावर तपासणी होत नाही. याचाच गैरफायदा घेऊन सोन्यासह विमानतळाबाहेर पडण्याचा त्याचा डाव होता. परंतु अबकरी अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे डाव फसला. ही कारवाई अबकारी आयुक्त मिहीर राजन व संयुक्त आयुक्त एम. एस. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.