काँग्रेस बळकटीसाठी स्वत:हून पुढे या!

अॅड. खलपांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd January 2021, 10:59 pm
काँग्रेस बळकटीसाठी स्वत:हून पुढे या!

पणजी : राज्यातील चाळीसही मतदारसंघांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाला पुन्हा बळकटी मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षासाठी कार्य करणाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन सदृढ लोकशाहीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी शनिवारी सोशल मीडियाद्वारे केले.
काँग्रेसच्या सदस्य नोंदणी आणि अंतर्गत फेरबदल करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागताच अॅड. खलप यांनी शनिवारपासून नव्या जोमाने कामही सुरू केले. आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार तसेच केंद्रीय मंत्री म्हणून काम करीत असताना गेली चाळीस वर्षांपासून संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाचे काम नव्या ताकदीने सुरू करण्याचे आवाहन खलपांनी केले. राज्य विधानसभा निवडणूक वर्षभरात कधीही होऊ शकते. त्यासाठी प्रदेश काँग्रेसला अंतर्गत आणि चाळीसही मतदारसंघांत बळकट करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील मोहीम पक्षाच्या नेत्यांनी सुरू केली आहे. पण त्यासाठी चाळीसही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.
समन्वय समितीचा अध्यक्ष या नात्याने पक्षातील जुन्या आणि नव्या नेत्यांना सोबत घेऊन आपण पुढे जाणार आहे. जिल्हा, तालुका, गाव आणि बूथ पातळीवर पक्षाला मजबूत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून त्याला पक्ष कार्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. पालिका निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर लढविण्यासंदर्भात पक्षाने अजून निर्णय घेतलेला नाही. पण पालिका निवडणुकांपर्यंत पक्ष मजबूत करून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आपण निश्चित केले आहे. त्यादृष्टीने शनिवारपासूनच कामही सुरू केले आहे, असेही अॅड. खलप यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अंतर्गत कलहांमुळे प्रदेश काँग्रेसची अवस्था दयनीय झाली होती. त्यातच भाजपने तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या दहा आमदारांना एका रात्रीत फोडल्यानंतर काँग्रेस पूर्णपणे हादरून गेला. जुन्या आणि नव्या नेत्यांतील समन्वयाचा अभाव, वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नेत्यांची सुरू असलेली धडपड, पक्षापासून दूर जात असलेले कार्यकर्ते आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत झालेला मोठा पराभव यांमुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधील आत्मविश्वास नष्ट होण्याच्या मार्गावर असतानाच अखिल भारतीय काँग्रेस समितीने समन्वय समिती स्थापन करून पक्षाला पुन्हा उभे करण्याचा निर्णय घेतला. राजकारणाचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या अॅड. रमाकांत खलप यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केल्याने काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील, असा विश्वास राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

खलपही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी अजूनही मंजूर केलेला नाही. पण त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि नावेलीचे आमदार लुईझिन फोलेरो यांच्यात प्रदेशाध्यक्षपदासाठी शर्यत होती. आता समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याने अॅड. रमाकांत खलप यांचेही नाव या शर्यतीत आले आहे. किंबहुना त्याच हेतूने पक्षाने पुन्हा एकदा खलपांना वर्तुळात आणल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा