श्रीपाद भाऊंच्या प्रकृतीत सुधारणा

मुख्यमंत्र्यांची माहिती; एम्सच्या डॉक्टरांकडूनही पाहणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2021, 12:24 am
श्रीपाद भाऊंच्या प्रकृतीत सुधारणा

पणजी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत बुधवारी आणखी सुधारणा झाली आहे. दिल्लीतील एम्स इस्पितळातील डॉक्टरांच्या पथकाने गोव्यात दाखल होऊन मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळीही नाईक यांच्यावरील उपचारांची पाहणी केली आहे. आगामी २४ तास त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कर्नाटकातील अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर श्रीपाद नाईक यांना सोमवारी रात्रीच बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याच रात्री त्यांच्यावर चार शस्त्रक्रिया केल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी गोमेकॉला भेट देत नाईक यांच्यावरील उपचारांचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नाईक यांच्यावरील उपचारांकडे लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक दिवशी गोमेकॉला भेटही देत आहेत.
बुधवारी सकाळी गोमेकॉत जाऊन श्रीपाद नाईक यांच्यावरील उपचारांची माहिती घेतल्यानंतर श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोमेकॉतील डॉक्टारांकडून नाईक यांना दर्जेदार उपचार देण्यात येत आहेत. त्यामुळे एम्समधील डॉक्टरांच्या पथकाने नाईक यांच्यावर पुढील उपचार गोव्यातच सुरू ठेवण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले. बुधवारी आपण श्रीपाद नाईक यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आपणास दिसून आले. त्यांनी आपल्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला. पण पुढील २४ तास त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखालीच ठेवण्यात येणार आहे. एम्सचे डॉक्टरही दिल्लीतून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
विजया नाईक यांच्यावर आज अंत्यसंस्कार
अपघातात मृत पावलेल्या विजया नाईक यांच्या मृतदेहावर गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या आडपई-दुर्भाट या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत रायबंदर येथे, तर ९.३० ते दुपारी १२ पर्यंत आडपई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा