इफ्फीच्या उद्घाटनाला जेमतेम ३०० जणांनाच प्रवेश

करोनाच्या पार्श्वभूमीवर संख्येवर मर्यादा; चित्रपटांचे ऑनलाइन प्रदर्शन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2021, 12:19 am
इफ्फीच्या उद्घाटनाला जेमतेम ३०० जणांनाच प्रवेश

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कला अकादमीच्या प्रवेशद्वारावर उभारलेली मनोहरी कमान. (नारायण पिसुर्लेकर)      

पणजी : यंदा १६ जानेवारीपासून हायब्रिड पद्धतीने होणाऱ्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या यंदाच्या उद्घाटनाला तीनशेहून कमी उपस्थिती राहणार आहे. अतिथी आणि महनीय व्यक्ती सोडून अतिरिक्त जेमतेम १०० जणांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे बहुसंख्यांना ऑनलाइन वा दूरचित्रवाणीद्वारेच उद्घाटन समारंभाचा आनंद घ्यावा लागणार आहे.
५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अवघे तीनच दिवस शिल्लक राहिल्याने तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला असून कला अकादमी तसेच मनोरंजन संस्थेसमोर प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे दोनशेच्या वर सिनेरसिकांना प्रवेश देणे शक्य होणार नाही. उद्घाटन कार्यक्रमास अतिथी व महनीय व्यक्तींचा आकडो दोनशेच्या आसपास असेल. आणखी ५० लोकांना प्रवेश मिळू शकतो, अशी माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली.
सत्यजीत रे यांच्या चित्रपटांचे विशेष प्रदर्शन
उद्घाटन समारंभाला केंद्रीय माहिती आणी प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती असेल. दरम्यान, चित्रपट महोत्सवाच्या सर्व गटांतील चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. विख्यात दिग्दर्शक सत्यजीत रे यांचे चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत. चारूलता, घरे बाइरे, पाथरे पांचाली, शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे चित्रपट प्रदर्शित होतील. सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.