सेलिब्रिटींचे शरीर साजरीकरणाचे वाढते फॅड

खडे बोल

Story: दीपक लाड |
10th January 2021, 01:05 pm
सेलिब्रिटींचे शरीर साजरीकरणाचे वाढते फॅड

आमच्या कॉलेजकाळात टीव्ही नव्हता. इंटरनेटचे आगमन तर हल्लीचे- म्हणजे पंचवीस वर्षामागचे. तरूणांना ग्लॅमर न्याहाळण्याची संधी तशी त्याकाळात कमीच. रूसी करांजीया या कट्टर कम्युनिस्टाने प्रकाशित केलेल्या 'ब्लीट्झ' या साप्ताहिकाच्या मलपृष्ठाच्या कोपऱ्यात कंचुकी घातलेल्या सुंदरीचा फोटो असायचा. पेपर विक्रेत्याची नजर चुकवून त्या चित्रावर नजर मारण्याचे प्रयत्न मित्रमंडळी करायची. पकडले गेल्यावर विक्रेता सुनवायचा-  “तिला घरी घेऊन जा आणि निवांत बघत बसा. फुकटात कसला आनंद शोधताय?” निर्लज्जपणे हसत टोळके तिथून खिसकायचे. 

'डेबोनेर' नामक इंग्रजी मासिकाच्या प्रत्येक अंकात चारेक टॉपलेस मॉडेलांचे विविध पोजमधले फोटो विखुरलेले असायचे आणि मधोमध एक डबलपानी प्रचंड सेंटरस्प्रेड असायचा. हॉस्टेल कँटीनमध्ये उधारीत वडे खाणाऱ्या आणि बिले तंगवणाऱ्या आमच्या मित्रमंडळींची हे महागडे मासिक एकट्याने विकत घ्यायची ऐपत नव्हती. त्यामुळे सात-आठजण वर्गणी जमा करून ते विकत घ्यायचो. आळीपाळीने सेंटरस्प्रेड कोणी ठेवायचा याबाबत पूर्व समझौता झाल्यानंतरही मॉडेल भारी असल्यास कोणी तरी तो हमखास ढापायचा आणि त्यावरून वादावादी व्हायची. 

आमच्या कॉलेजकाळात ज्या मॉडेलांची अर्धनग्न चित्रे पहाण्यासाठी पोटाला चिमटा काढून तरूण 'डेबोनेर' घेण्यासाठी पैसे वाचवायचे, त्याच्यापेक्षा सरस मॉडेलांचे पोस्टर आज पणजीच्या १८ जून रस्त्यावरून हिंडताना स्त्रियांची आवरणे विकणाऱ्या दुकानांच्या शोकेसमध्ये आपल्याकडे पहात असतात. अशावेळी काळानुसार आपल्या भोवतालचे जग किती बदललेय याची जाणीव झाल्याने मनोमन हसतो.  

कुठे आठवीच्या वर्गात विज्ञानाचे पुस्तक हाती पडताच कोपऱ्यात जाऊन आधी पुनरूत्पत्तीचा धडा पिंजून काढणारी आमची पिढी आणि त्याच्यापेक्षाही पलीकडचे ज्ञान आपल्या हातातील मोबइलमध्ये मिळवणारी आणि पाहणारी आजची पाचव्या यत्तेत शिकणारी मुले. स्वत:ला लोकमान्य, लोकशक्ती म्हणवून घेत पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर पदार्पण करत असलेल्या संस्कारी मराठी बाण्याच्या वृत्तपत्राच्या न्यूज अॅपवर सुंदरींची चित्रे झळकायला लागली ही तर एका प्रकारे सामाजिक क्रांतीच झाली म्हणायची. दरदिवशी बोल्ड अदा, हॉट अदा मथळ्याखाली वेगवेगळ्या तारकांच्या दहा- बारा पोज देणारी चित्रे अपलोड केली जात असतात आणि त्यांच्यावर मिळवलेल्या लाईक्सच्या संख्येवर वृत्तपत्र अगदी षोडश वर्षीयांसारखे सुखावलेले दिसते. मलायका अरोरा प्रकरण आता जून झालंय. मराठमोळ्या गायत्री दातार आणि अमृता खानविलकर तिच्या स्पर्धक बनून उभ्या ठाकल्यात. 

जगात करमणूक इंडस्ट्रीत कोणी तारका, मॉडेल जरा स्थूल दिसली तर तिला चिडवण्याचे प्रकार घडतात. त्याला इंग्रजीत ‘बॉडी शेमिंग’ म्हणतात. त्यानां चोख उत्तर देण्यासाठी हल्ली न्योमे निकोलस नामक कृष्णवर्णीय प्लस सायझ (महाकाय) मॉडेलने नग्न पोझेस इंन्स्टाग्रामवर टाकल्या होत्या. प्रकरण कायद्याच्या कक्षेबाहेर पडू नये याची खबरदारी घेत आवश्यक तो भाग मोठ्या शिताफीने स्वहस्ते झाकला होता. तिचे फोटो इन्स्टाग्रामच्या व्यवस्थापनाने डीलिट केल्यावर केवळ वर्णव्देशातून ही पक्षपातपूर्ण कृती केली गेली असल्याचे आरोप इन्स्टाग्रामवर लावले गेले होते. आपल्या मराठमोळ्या वनिता खरातने कदाचित इथूनच प्रोत्साहन घेतले असावे असे वाटते. शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह' सिनेमात छोट्याशा रोलमध्ये वनिता दिसली होती. सध्या सोनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मराठी विनोदी कार्यक्रमामध्ये दिसते. मल्ल्यांच्या किंगफिशर कॅलेंडरमध्ये झळकणाऱ्या अर्धनग्न मॉडेलना लाजवेल अशी नग्न पोज या बाईने एका कॅलेंडरसाठी देत पूनम पांडे आणि साक्षात सनी लिओनी सारख्यांची हवाच काढली. 

पुरता नग्न नव्हे. धरती तलावरील प्रथम पुरूष अॅडमची पत्नी इव्ह लज्जारक्षणासाठी जसा पानाचा वापर करते तशी एका भल्या मोठ्या पतंगाच्या आड लज्जा लपवत ती पहुडलेली दिसली. “माझे टेलेंट, पॅशन्स, कॉनफिडन्सचा मला अभिमान आहे. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे कारण मी ही मी आहे” अशा आशयाचे ‘मौलिक विचार’ तिने तिथे व्यक्त केलेत. त्या कॅलेंडरांतल्या फोटोच्या माध्यमांतून वनिताने तिला डिवचणाऱ्यांना दिलेले उत्तर सई ताम्हणकरांनाही भावले. आपल्या शरीरावर कॉमेंट्स करणाऱ्यांचे खरे तर कपडे फेडायचे सोडून आपण स्वत: आपले उतरवल्याने त्यांना अद्दल कशी काय घडते, याचा बोध नाही होत बुवा. विशेष म्हणजे आपल्या लोकप्रिय, लोकशक्ती मऱ्हाटी वृत्तपत्राने लागलीच आपल्या न्यूज अॅपवर तो फोटो अपलोडदेखील करून टाकला.   

'स्वतःच्या शरीरावर प्रेम करा', या थीमखाली सर्वप्रथम १९९१ मध्ये हॉलिहूड अभिनेत्री डॅमी मूरने बाळंतपणाच्या नवव्या महिन्यांत आपला नग्न फोटो 'वेनिटी फेअर' मासिकाच्या मुखपृष्ठावर छापून आणला होता. १९९० मध्ये तिचा घोस्ट नावाचा चित्रपट ज्यामध्ये पॅट्रीक श्वेयझ आणि हूपी गोल्डबर्गच्या भूमिका होत्या. तो बॉक्सऑफिसवर गाजला होता. त्यामुळे ती चर्चेत आलेली. त्या लोकप्रियतेचा फायदा तिने त्यादरम्यान उठवला. 

वेनिटी फेअर, कॉस्मोपॉलिटन, वोग सारख्या महागड्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीत प्रकाशित झालेले लेख शिळे झाल्यावर त्यांचे संकलन करून 'परेड' नावाचे मासिक देशी संस्करण काढत असे. त्यातून डॅमीची अफलातून अदा त्यावेळी देशवासियांच्या नजरेत भरली. तिच्या बोल्ड कृत्याचे नेहमीसारखे एका उदारमतवादी वर्गाने समर्थन केले तर रूढीवादींनी ते धिक्कारले. त्याचे अनुकरण आपल्या सिने इंडस्ट्रीत घडणे अपरिहार्य होते. गरोदर अभिनेत्री लिझा हेडन 'एली' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली होती, पण डॅमीच्या अवतारात नव्हे तर टू पीस बिकीनीमध्ये. त्यानंतर समीरा रेड्डी, कोंकणा सेन शर्मा यानीही आपापल्या बेबी बंप्सचे देशवासीयांना दर्शन घडवले. अंगप्रदर्शनामध्ये पाश्चात्य अभिनेत्रींचा मोकळेपणा आपल्याकडे यायला वेळ लागणार आहे, पण आजचा मूड पाहिल्यास येत्या काही वर्षांत तसली छायाचित्रे आपल्या मराठी वृत्तपत्राच्या न्यूज अॅपमध्ये झळकू शकतील, असा विश्वास जरूर वाटतो.   

लॉकडाउनच्या काळात कामाविना सॅलिब्रीटी जोडपी घरात कोंडून राहिल्यामुळे म्हणा, बऱ्याच तारका गरोदर झाल्या. विराट पत्नी अनुष्का आणि सैफ पत्नी बेगम करीना यांचे बाळंतपण साहजिकच इतरापेक्षा जास्त प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनीही वेळोवेळी भिन्न पोझेसमध्ये आपल्या वाढत असलेल्या उदराचे फोटो नेटवर टाकत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचवत त्यातून बऱ्यापैकी आर्थिक कमाईही केली. आतापर्यंत हे फोटो पेहरावात होते. या महिन्यात मात्र अनुष्काने एक पाउल पुढे टाकत आपल्या कोटातून बाहेर डोकावणारा अनावृत बेबी बम्पचा फोटो 'वोग' मासिकाच्या मुखपृष्ठावर छापून आणला. 

स्वतःचे शरीर सेलिब्रेट करणाऱ्या भावनेचे जरी उदात्तीकरण करण्यात येत असले तरी यात धंद्याचा भाग असतो. वनिताने केवळ शरीराचे साजरीकरण करण्यासाठी कॅलेंडरसाठी काही फुकटात कपडे उतरवले नसणार. तिने त्या रावण फिचर्सकडून प्रचंड फी आकारली असणारच. त्यांनाही शूटींगच्या वेळी केशरचनाकार, मेकअप आर्टीस्ट, फोटोग्राफर आणि त्या सर्वांचे सहायक अशा सगळ्यांना मेहनताना द्यावा लागत असणारच. फिचरवाले कॅलेंडर विक्रीतून हा खर्च भरून काढून नफा कमवणार, हेही तितकेच खरे. 

करीनाने परिधान केलेल्या प्रेग्नन्सी ड्रेसची संकल्पना सव्यसाची या प्रसिद्ध डिझायनरची होती. त्याच्या ड्रेसची मॉडेलिंग करीनाने गलेलठ्ठ फी आकारल्याशिवाय तर केली नसणार. तोसुद्धा तिच्या नावावर तसले प्रेग्नसी गाउन देशांतल्या उच्चभ्रू घराण्यातल्या गरोदर पत्नी, सूनांना विकून पैसे कमवणार आहे. 'वोग'च्या कव्हरसाठी दिलेल्या फोटोसाठी अनुष्कानेही बऱ्यापैकी मानधन घेतले असणार. तिच्यामुळे मासिकही जास्त आवृत्या विकेल हेही निश्चित. तिच्या पोटी असलेले मूल इंग्रजी म्हणीत म्हटल्यासारखे चांदीचा चमचा मुखी धरून नव्हे तर चांगला २४ कॅरेट सोन्याची मोठी पळी मुखी धरून जन्माला येणार आहे. एखादा मध्यम श्रेणीचा शासकीय अधिकारी साडेतीन दशके नोकरी केल्यानंतर जेवढी फंडाची रक्कम घेऊन घरी जात असतो, त्याच्याहून जास्त रक्कम त्या जन्माला न आलेल्या बाळाने गेल्या नऊ महिन्यांत आईच्या उदरात बसून कमवलीय. कदाचित देशातला सर्वात लहानगा पेनकार्डधारकही ते मूल जगात पदार्पण करताना बनू शकेल. हे सगळे या बॉडी सेलिब्रेशन प्रकारामागचे अर्थकारण.    

कॉलेजकाळात डेबोनेरसकट पकडला गेल्यावर भेदरलेला मित्र या उद्योगांत लिप्त इतर गुंतवणूकदारांची नावे सांगून मोकळा झाला होता. रॅक्टरने सगळ्यांची अगदी बिनपाण्याने हजामत केली होती आणि असली घाणेरडी (?) मासिके पुन्हा कधी हॉस्टेलात दिसणार नाहीत, याची खबरदारी घेणार असल्याचे सगळ्यांकडून वचन घेऊन प्रकरण मिटवले होते. काळ बदललाय. कालचे ‘घाणेरडे’ प्रकार आज स्वीकार्य होत सर्रासपणे साजरे केले जात असताना आमच्यात आज नसलेल्या त्या रेक्टरांची आवर्जून आठवण येते. 

-