कोळसा विरोधकांची सचिवालयास धडक

मुख्यमंत्र्यांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2020, 11:58 pm
कोळसा विरोधकांची सचिवालयास धडक

पर्वरी मंत्रालयावर काढलेल्या मोर्चावेळी ‘गोंयात कोळसो नाका’चे कार्यकर्ते.

पणजी : राज्यातील कोळसा हाताळणी बंद करण्यासह रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सरकारने बंद न केल्यास ‘गोंयात कोळसो नाका’चे आंदोलन अधिक उग्र होईल. त्यानंतर राज्यात जे घडेल त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार असतील, असा इशारा संघटनेने बुधवारी दिला.
कोळसा तसेच रेल्वे मार्ग दुपदरीकरणासंदर्भातील आपल्या मागण्यांबाबत ‘गोंयात कोळसो नाका’ संघटनेने बुधवारी सकाळी सचिवालयास धडक दिली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिवालय परिसरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयातील कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
दरम्यान, सचिवालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केवळ कोळसा वाहतुकीसाठीच आहे. पण सरकार या प्रकल्पावरून जनतेला फसवू पाहत आहे. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास राज्यातील कोळसा हाताळणी आणि वाहतुकीत वाढ होईल. त्यामुळे राज्यातील प्रदूषणात वाढ होऊन त्याचा फटका जनतेला सहन करावा लागेल. त्यामुळेच आम्ही कोळशाविरोधात अनेक महिन्यांपासून चळवळ उभी केली आहे.
याआधी २०१७ मध्ये राज्यातील शंभरपेक्षा अधिक पंचायतींनीही कोळसा हाताळणीस विरोध केलेला असतानाही केवळ जिंदाल आणि अदानींसारख्या बड्या उद्योजकांसाठी केंद्र आणि सरकार गोव्याला उद्धवस्त करू पाहत आहे. त्यामुळेच आम्ही सरकारला ही शेवटची संधी देत आहोत. आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पर्यावरणमंत्र्यांनी पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार करणे गरजेचे आहे. पण राज्याचे पर्यावरणमंत्री असलेले नीलेश काब्राल पर्यावरणाचे रक्षण करण्याऐवजी अदानी, जिंदालसाठी गोव्याचे भक्षण करीत आहेत. अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मीना महासंचालक की भाजप प्रवक्ते?
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिस महासंचालकांनी पार पाडायची असते. पण गोव्याचे महासंचालक मुकेश कुमार मीना भाजपचे प्रवक्ते असल्यासारखी वक्तव्ये करीत आहेत, अशी टीका कोळसा विरोधकांनी केली. सरकारी यंत्रणांचा वापर करून सरकार जनतेवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा