दिल्लीतून येणाऱ्या विमाने, रेल्वेंसाठी मार्गदर्शक तत्त्वे!

सरकारचा निर्णय; आरोग्य सचिवांना बैठक घेण्याचे निर्देश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd November 2020, 12:28 am
दिल्लीतून येणाऱ्या विमाने, रेल्वेंसाठी मार्गदर्शक तत्त्वे!

पणजी : दिल्लीतून गोव्यात येणाऱ्या विमान आणि रेल्वेेंसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. विमाने व रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी करण्याबाबत तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश आरोग्य सचिवांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी सोशल मीडियाद्वारे दिली.
गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. बाधितांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतून विमान तसेच रेल्वेमार्गे अनेक प्रवासी गोव्यात येत असल्याने राज्यातील करोनाबाधितांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्याशेजारील महाराष्ट्र तसेच इतर राज्यांनीही दिल्लीतून येणाऱ्या विमाने व रेल्वेंसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. त्याचा अभ्यास करून गोव्यातही त्याचा अवलंब करण्याचे तसेच येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी तत्काळ बैठक घेण्याची सूचना आरोग्य सचिवांना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छठ पूजेचा सण संपल्यानंतर उत्तर प्रदेशातील कामगार रेल्वेमार्गे गोव्यात येण्यास सुरुवात होणार आहे. करोना काळात आपापल्या राज्यांत गेलेले कामगार तसेच व्यावसायिक रेल्वे, विमानांद्वारे पुन्हा गोव्यात येत आहेत. यातील अनेकांचा दिल्लीशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी नियमावली जारी करून त्यांच्या चाचण्या करण्याची आवश्यकताही​ भासू शकते. राज्य सरकार सध्या त्या दृष्टीने विचार करीत आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना मृत तसेच बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे बरे होण्याचा दरही ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत करोनाचा प्रसार वाढत असलेल्या दिल्लीतून प्रवासी आणि पर्यटक यांचा लोंढा वाढत गेल्यास गोव्यात पुन्हा करोनाचा स्फोट होऊ शकतो. तसे झाल्यास राज्यावर पुन्हा बिकट संकट ओढवू शकते. याची जाणीव झाल्यामुळेच सरकारने आतापासूनच दिल्लीतून येणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे.

तीन मृतांसह ११६ बाधित
राज्यात शनिवारी तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ६७५ झाला आहे. नवे ११६ बाधित सापडले असून, १४७ जण करोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या १,२६१ वर आली आहे. करोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याने बरे होण्याचा दर ९५.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे. साळगाव येथील ७३ तसेच डिचोली येथील ६९ वर्षीय पुरुष आणि चिखली येथील ६३ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला.

हेही वाचा