Goan Varta News Ad

स्वास्थ्यासाठी सोनिया गोव्यात!

दिल्लीतील प्रदूषणामुळे निवडला गोवा; भाजपकडून काँग्रेसची खिल्ली

|
20th November 2020, 11:21 Hrs
स्वास्थ्यासाठी सोनिया गोव्यात!

फोटो : गोव्यात दाखल झालेले सोनिया आणि राहुल गांधी.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : राजधानी दिल्लीतील प्रदूषण वाढत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आपले पुत्र तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह शुक्रवारी गोव्यात दाखल झाल्या. शुक्रवारी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर सोनिया आणि राहुल गांधी आपल्या निवासस्थानी दाखल झाले.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोनिया गांधी यांना छातीच्या संसर्गाचा त्रास आहे. त्यावर त्या उपचारही घेत आहेत. वाढत्या प्रदूषणाचा आरोग्याला फटका बसू नये, यासाठी कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिला होता. त्यासाठी चेन्नई आणि गोवा या दोन ठिकाणांचा विचार सुरू होता. पण सोनियांनी गोव्याला पसंती देत पुढील काही दिवस गोव्यातच घालविण्याचे निश्चित केले. शुक्रवारी राहुल गांधी यांच्यासोबत त्या गोव्यात दाखल झाल्या.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून सोनिया गांधी वारंवार इस्पितळांमध्ये जात आहेत. जुलैमध्ये त्यांच्यावर दिल्लीतील एका इस्पितळात उपचार सुरू होते. सप्टेंबरमध्येही राहुल गांधी यांच्यासोबत वैद्यकीय उपचारांसाठी त्या विदेशात गेल्या होत्या. दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात सोनिया गांधी आपल्या परिवारासह गोव्याला भेट देत असतात. जानेवारी २०२० मध्येही तीन दिवसांसाठी त्या गोव्यात आल्या होत्या.

दरम्यान, विधानसभा निवडणूक अवघ्या चौदा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याआधी जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे नेते जागृत झाले आहेत. करोना, आर्थिक स्थिती, कोळसा प्रदूषण, मोलेतील तीन प्रकल्प, रेल्वे दुपदरीकरण आदी विषयांवरून रस्त्यावर उतरत ते सरकारला घेरत आहेत. अशावेळी खुद्द पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी शुक्रवारपासून पुढील काही दिवस गोव्यातच असणार आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते सरकारविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा गोवा दौरा खासगी स्वरूपाचा आहे. आपण गोव्यात येत असल्याची माहिती त्यांनी प्रदेश काँग्रेसलाही दिलेली नव्हती. अशा परिस्थितीत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करून आम्ही त्यांना कोणताही त्रास देऊ इच्छित नाही.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष