Goan Varta News Ad

आणखी पाच बळी; २१५ बाधित

आणखी पाच बळी; २१५ बाधित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:54 Hrs

पणजी : शुक्रवारीही राज्यातील आणखी पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा ६०२ झाला आहे. नवे २१५ बाधित आढळून आले असून, २४१ जण करोनातून मुक्त झाले. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या २,४०५ झाली आहे. करोनामुक्त झालेल्यांची संख्या पुन्हा वाढल्याने बरे होणाऱ्यांचा दर वाढून तो ९३.०७ टक्क्यांवर आला आहे.
वास्को येथील ७२ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ७० वर्षीय पुरुष, पेडणे येथील ६४ वर्षीय पुरुष, केपे येथील ३६ वर्षीय युवक व हळदोणा येथील ७७ वर्षीय महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला. पाचही मृत व्यक्तींना करोनासोबतच इतर गंभीर आजार होते. पाचपैकी चौघांचा गोमेकॉत, तर एकाचा हॉस्पिसियो इस्पितळात मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य खात्याने आपल्या दैनंदिन अहवालातून दिली आहे. दरम्यान, राज्यात सुरुवातीपासून आतापर्यंत ४३,४१६ करोनाबाधित सापडले असून, त्यातील ४०,४०९ जण करोनामुक्त झाले आहेत, असेही आरोग्य खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.
आरोग्य सचिवही करोनाबाधित
आरोग्य सचिव अमित सतेजा यांनाही करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी घरी अलगीकरणात राहणे पसंत केले आहे. नीला मोहनन यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर सतेजा यांच्याकडे आरोग्य सचिवपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.